जुलै महिन्यातील महागाईचे आकडे स्पष्ट होण्यास काही दिवसांचा अवधी असतानाच, महागाई दर ६ टक्क्यांखाली आल्यास व्याजदर कपात नक्कीच केली जाईल, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी बुधवारी स्पष्ट केले.
मध्यवर्ती बँकेचे स्थिर व्याजदराचे चालू आर्थिक वर्षांतील चौथे द्वैमासिक पतधोरण मंगळवारीच त्यांनी जाहीर झाले. त्यानंतर एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजन यांनी संभाव्य व्याजदराचे संकेत दिले. बँकेने जानेवारी ते मार्च २०१६ दरम्यान महागाईचे ६.१ टक्के लक्ष्य राखले आहे.
गव्हर्नर म्हणाले की, महागाईत येत्या कालावधीत नक्कीच उतार येईल. दरम्यान व्याजदर कमी झाले आणि अपेक्षित ६ टक्क्यांखाली महागाई दर येताना दिसला तरी दर कपातीचे धोरण कायम असेल. उद्दिष्टापेक्षा दर कमी होऊन आणखी दर कपात करता यावी, असेच बँकेचे धोरण असेल.
फेडरल रिझव्‍‌र्हने दर वाढ केली तर त्याचा सुरुवातीचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण करणारा ठरेल, असे मत व्यक्त करत गव्हर्नरांनी चालू आर्थिक वर्षांसाठी ७.६ टक्के या देशाच्या विकास दराबाबत विश्वास व्यक्त केला.
मान्सूनमध्ये अद्याप प्रगती नसल्याने व अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या निर्णयाची प्रतीक्षा असल्याने तूर्त दर कपात करण्यात आली नाही, असे समर्थन डॉ. राजन यांनी मंगळवारच्या पतधोरणानंतर केले होते. तसेच देशाच्या अर्थविकास प्रवासाबाबतच्या आकडेवारीचीही आपल्याला दर कपातीसाठी प्रतीक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले होते.
मध्यवर्ती बँकेने २०१५ मध्ये आतापर्यंत ०.७५ टक्के दर कपात केली आहे. बँकेचे पुढील पतधोरण २९ सप्टेंबर रोजी जारी होत आहे. जूनमध्ये किरकोळ महागाई दर ५.४ टक्क्यांवर येताना गेल्या आठ महिन्यांतील तळात विसावला आहे.
जुलैमधील घाऊक व किरकोळ महागाई दर तसेच जूनमधील औद्योगिक उत्पादन दर येत्या काही दिवसांत जाहीर होणार आहे.