scorecardresearch

इन्फोसिसचा तिमाही नफा ५,६८६ कोटींवर

देशातील दुसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसने बुधवारी टीसीएसपाठोपाठ चौथ्या तिमाहीत चांगल्या कामगिरीची नोंद करत ५,६८६ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची नोंद केली.

मुंबई : देशातील दुसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसने बुधवारी टीसीएसपाठोपाठ चौथ्या तिमाहीत चांगल्या कामगिरीची नोंद करत ५,६८६ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची नोंद केली. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. बेंगळूरु येथे मुख्यालय असलेल्या इन्फोसिसने गेल्या वर्षी याच काळात ५,०७६ कोटी रुपयांचा करपश्चात नफा नोंदविला होता. मात्र गेल्या तिमाहीच्या तुलनेत सरलेल्या मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात २ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या तिमाहीत कंपनीने ५,८०९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

कंपनीने जानेवारी ते मार्च २०२२ या चौथ्या तिमाहीत ३२,२७६ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. वार्षिक तुलनेत त्यात २३ टक्क्यांची वाढ झाली आहे, मात्र ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ तिमाहीशी तुलना करता त्यात एक टक्क्याची घसरण झाली आहे. या तिमाहीत ३१,८६७ कोटींच्या महसुलाची कंपनीने नोंद केली होती. तर जानेवारी-मार्च २०२१ तिमाहीत कंपनीने २६,३११ कोटी रुपयांचा एकत्रित महसूल मिळविला होता.

सरलेल्या २०२१-२२ या संपूर्ण आर्थिक वर्षांत इन्फोसिसने २२,११० कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. जो त्या आधीच्या वर्षांच्या तुलनेत १४ टक्क्यांनी अधिक राहिला आहे. एप्रिल-मार्च २०२१ या कालावधीत कंपनीने वर्षभरात १९,३५१ कोटींचा नफा मिळविला होता. तर महसुलाच्या आघाडीवर २१ टक्क्यांची वाढ नोंदवत १,२१,६४१ कोटी रुपयांची महसूल प्राप्ती केली आहे. आधीच्या आर्थिक वर्षांत कंपनीने १,००,४७२ कोटी रुपयांचा महसूल मिळविला होता. कंपनीच्या संचालक मंडळाने भागधारकांना खूश करताना, पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक समभागासाठी १६ रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे. 

ग्राहकांकडून मोठय़ा, दीर्घ मुदतीचे करार करण्यापेक्षा अल्प कालावधीचे करार करण्याला अधिक प्राधान्य दिले जात आहे. सतत होणाऱ्या डिजिटल परिवर्तनामुळे प्रकल्प राबविण्याच्या त्यांच्या गरजेनुरूप ग्राहक अल्प कालावधीच्या कराराला प्राधान्य देत असले तरी कंपनीने सरलेल्या तिमाहीत स्थिर कामगिरी केली आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांनी सांगितले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Infosys quarterly profit rises country second number software service ysh

ताज्या बातम्या