मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसने ‘मूनलाइटिंग’बाबत अर्थात एकाच वेळी दोन ठिकाणी काम करण्याच्या सध्या चर्चेत असलेल्या प्रस्तावाबाबत चिंता व्यक्त केली असून, कर्मचाऱ्यांना त्याचा वापर न करण्याबाबत इशारा दिला आहे.

कंपनीच्या आचारसंहितेनुसार, कोणीही कर्मचारी एकाच वेळी दोन ठिकाणी काम करू शकत नाही. कोणी कर्मचारी तसे करताना आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल, असे इन्फोसिसने स्पष्ट केले. ‘नो डबल लाइव्हज’ या शीर्षकाखाली कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे तिची भूमिका कळविली आहे. कंपनीने नव्याने दाखल उमेदवारांना प्रस्तावपत्रातच, ‘मूनलाइटिंग’ला परवानगी न देणारा नियम सामावून घेतला आहे. कंपनीची या संदर्भात पूर्वसंमती आवश्यक ठरेल आणि कंपनीला योग्य वाटेल त्या वेळी अटी व शर्तीच्या अधीन अशी संमती दिली जाऊ शकते आणि कंपनीच्या विवेकबुद्धीनुसार ती कधीही मागे घेतली जाऊ शकते, असेही इन्फोसिसने ई-मेल संदेशात नमूद केले आहे.

नवीन प्रथा म्हणून ‘मूनलाइटिंग’बाबत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची चिंता वाढली आहे. गेल्या महिन्यात २० ऑगस्टला विप्रोचे संचालक रिशाद प्रेमजी यांनी सर्वप्रथम याबाबत आश्चर्य आणि चिंता व्यक्त करताना, हा नियोक्त्यांशी केला जाणारा विश्वासघात असल्याचे म्हटले होते. घरोघरी खाद्यपदार्थाचा बटवडा करणारे व्यासपीठ असलेल्या ‘स्विगी’ने ऑगस्टच्या सुरुवातीस कर्मचाऱ्यांसाठी ‘मूनलाइट पॉलिसी’ची घोषणा केली होती. या योजनेनुसार स्विगीने कर्मचाऱ्यांना त्यांचे नित्य कामाचे तास संपल्यावर, सुट्टीच्या दिवशी कुठल्याही स्वयंसेवी संस्था, सोशल मीडियावर काम करणाऱ्या संस्थांमध्ये काम करण्याची मुभा दिली आहे.

बडय़ा माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आधीच कर्मचारी गळतीचा सामना करत आहेत. सतत कुशल आणि प्रतिभावान कर्मचाऱ्यांना सेवेत राखून ठेवण्यासाठी, अशा कर्मचाऱ्यांना मोठे वेतनमानही दिले जाते. बौद्धिक भांडवलावर आधारित या उद्योगात गुणी मनुष्यबळ हीच सर्वात मोठी मत्ता असते. कुशल आणि अनुभवी अशा दोन्ही गुणांचा मिलाफ असणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमतरता हे या कंपन्यांसाठी मोठे आव्हान आहे.

मूनलाइटिंग म्हणजे काय?

एखादा कर्मचारी नियमित नोकरीसोबतच, एकाच वेळेस दुसऱ्या कंपनीसाठीदेखील आंशिक रूपात काम करतो, यालाच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात ‘मूनलाइटिंग’ म्हटले जाते. यात एका कंपनीसोबत नियमित सेवेतील कर्मचारी, अन्य कंपनीच्या तात्कालिक प्रकल्पावरदेखील कार्य करत असतो. मात्र बऱ्याचदा ज्या कंपनीत नियमित नोकरी सुरू असते त्या कंपनीपासून ही माहिती दडवून ठेवण्यात येते.