पीटीआय, नवी दिल्ली
विमा नियामक ‘इर्डा’ने आयुर्विमा कंपन्यांना कोणत्याही पूर्वपरवानगीविना नवीन विमा उत्पादने सादर करण्यास शुक्रवारी हिरवा कंदील दिला. यामुळे आयुर्विमा कंपन्यांना आता काळानुरूप नवीन विमा उत्पादने कोणत्याही विलंबाशिवाय आणि ग्राहकांच्या गरजांनुसार सादर करता येणार आहे.
गेल्या आठवडय़ात आरोग्य विमा आणि सामान्य विमा कंपन्यांसाठी असाच निर्णय ‘इर्डा’ने जाहीर केला आहे. आता त्याचा आणखी विस्तार करत आयुर्विमा कंपन्यांनादेखील परवानगी देण्यात आली आहे. संपूर्ण देशातील नागरिकांना विमा कवच देण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत विमा क्षेत्रात सुधारणेच्या दिशेने सतत प्रयत्न केले जात आहेत, असे ‘इर्डा’ने दिलेल्या निवेदनात सांगितले आहे.

विमा कंपन्यांना कोणतेही नवीन विमा उत्पादने बाजारात सादर करण्यापूर्वी ‘इर्डा’ची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक होते. मात्र आता नियम पालनाची पूर्वकामगिरी चांगली असणाऱ्या विमा कंपन्यांच्या नवीन उत्पादनांना परवानगी दिली जाऊ शकते. आयुर्विमा कंपन्यांना आता केवळ वैयक्तिक बचत विमा, वैयक्तिक निवृत्तिवेतन (पेन्शन) संबंधित विमा उत्पादने वगळता इतर कोणतीही नवीन उत्पादने सादर करता येणार आहेत. यामुळे विमा कंपन्यांसाठी व्यवसायाच्या संधी वाढण्याबरोबरच ग्राहकांनादेखील नवीन पर्याय उपलब्ध होणार आहेत.