पंजाब आणि महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्याने धास्तावलेल्या सर्व बँकांच्या खातेदारांना सरकारने आता दिलासा दिला आहे. बँक दिवाळखोरीत निघाली किंवा त्यात काही घोटाळा झाला तरी खातेदाराच्या ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित असतील. बँक डिपॉझिट इन्शुरन्स योजनेत बदल करण्याची घोषणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

आतापर्यंत कोणत्याही बँकेतील १ लाख रूपयांपर्यंतच्या ठेवीच सुरूक्षित असायच्या. एक लाखापर्यंतचेच विमा कवच कोणत्याही ठेवींना असायचे. आता त्यात बदल करण्यात येत असल्याचे सीतारामन यांनी जाहीर केले आहे. आता बँक डिपॉझिट इन्शुरन्स १ लाख रूपयांवरून ५ लाख रूपये करण्यात येत असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे बँकांमधील ठेवी सुरक्षित असतील, याबाबत खातेदारांमध्ये विश्वास निर्माण होईल, अशी आशा आहे.

आणखी वाचा – Budget 2020: करदात्यांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी सरकार कटिबद्ध : अर्थमंत्री

सहकारी बँकांच्या नियमांमध्ये बदल करणार असल्याचे सीतारामन यांनी जाहीर केले आहे. हे विमाकवच २ लाखांपर्यंत वाढवेल, अशी चर्चा अर्थसंकल्पाआधी सुरू होती.

पंजाब आणि महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेतील घोटाळ्यामुळे सरकार आणि रिझर्व्ह बँकेवरही टीका झाली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा घोटाळा उघडकीस आला होता. त्यामुळे हजारो खातेदार रस्त्यावर उतरले होते.