scorecardresearch

नवी मुंबईत लवकरच एकात्मिक ‘ज्वेलरी पार्क’ ; एमआयडीसीचा १३,८०० कोटींचा भाडेपट्टा करार

अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा या ज्वेलरी पार्कमध्ये देशभरातील निष्णात व प्रवीण कारागिरांना आणून त्यांना अल्प दरातील निवासस्थानेही विकसित करण्यात येतील.

मुंबई: रत्ने व आभूषण निर्मिती प्रकल्पांसाठी इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई (आयजेपीएम)’च्या स्थापनेसाठी एमआयडीसीने जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलशी (जीजेईपीसी) ९५ वर्षे कालावधीच्या भाडेपट्टे करारावर स्वाक्षरी केली आहे.

या माध्यमातून महाराष्ट्रात २० हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आकर्षित केली जाऊन, एक लाखाहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे.

या निमित्ताने झालेल्या कराराप्रसंगी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, जीजेईपीसीचे अध्यक्ष कॉलिन शहा, एमआयडीसीचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर, महाव्यवस्थापक (पणन व जनसंपर्क) अभिजीत घोरपडे, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल, जीजेईपीसीचे विभागीय अध्यक्ष अशोक गजेरा, सव्यसाची आदींची उपस्थिती होती.

नवी मुंबईत महापे येथे २१ एकर भूखंडावर हजाराहून अधिक रत्न व आभूषण क्षेत्रातील विविध प्रकल्प साकारण्याची या ज्वेलरी पार्कच्या मागे संकल्पना आहे. अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा या ज्वेलरी पार्कमध्ये देशभरातील निष्णात व प्रवीण कारागिरांना आणून त्यांना अल्प दरातील निवासस्थानेही विकसित करण्यात येतील. कामगारांसाठी प्रशिक्षण व कौशल्य विकासाच्या सुविधाही उपलब्ध असतील. ‘आयजेपीएम’ हा महाराष्ट्रात उभारण्यात येत असलेले रत्न व आभूषण उद्योगाला वाहिलेले एकात्मिक औद्योगिक उद्यान असेल, असे नमूद करून एमआयम्डीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जीजेईपीसीला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

’  २१ एकर क्षेत्रफळावर औद्य्ोगिक प्रकल्प

’  आभूषण क्षेत्रातील एक हजार निर्मिती उद्योग

’  २० हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक अपेक्षित

’  एक लाखाहून अधिक रोजगार संधींचा अंदाज

’  कामगारांसाठी निवास सुविधाही उभारणार

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Integrated jewelery park in navi mumbai soon zws