आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून भारताचे कौतुक

वॉशिंग्टन : व्यवसायपूरक वातावरण, सुलभ व्यापार अटीच्या दिशेन भारताकडून टाकली गेलेली पावले देशाच्या थेट विदेशी गुंतवणुकीत वाढीला पूरक असून देशाची वित्तीय तूटही यातून सुधारेल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या भारताबाबतच्या अहवालात, थेट विदेशी गुंतवणुकीबाबत देशाच्या उपाययोजना प्रगतिपथावर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. भारताच्या व्यापार धोरणाबाबतही प्रगती असून देशाला असलेली वित्तीय तुटीची चिंता काहीशी कमी होण्याची चिन्हे अहवालात नमूद करण्यात आली आहेत. भारताचे व्यवसाय वातावरण सुधारत असून देशांतर्गत अडथळे कमी होत आहेत, असे स्पष्ट करत अहवालात सुलभ व्यापारामुळे स्थानिक गुंतवणूक वाढून थेट विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल, असे नमूद करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात विमा, नागरी विमान वाहतूक, किरकोळ विक्रीसारख्या काही क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढीचा प्रस्ताव सादर केला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातून रोखे उपलब्ध करून निधी उभारणीची संकल्पनाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडली आहे.