आयसीआयसीआय लोम्बार्ड या सर्वसाधारण विमा कंपनीचे पुनर्विमा, जोखीम निर्धारण, विमा दावे या विभागांचे प्रमुख संजय दत्त यांना सर्वसाधारण विमा क्षेत्राचा २३ वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्या मते अत्यंत भांडवलप्रवण असलेल्या विमा उद्योगाची भांडवली गरजेच्या पूर्ततेसह, गुंतवणूकदार पाया विस्तारणे आणि या क्षेत्राला आवश्यक दृश्यमानता व प्रकाशझोत लाभणे हे भांडवली बाजारात समभागांच्या प्रस्तावित सूचिबद्धतेचे फायदे आहेत..

  •  विमा उद्योगाची नियंत्रक ‘आयआरडीआयए’ने विमा कंपन्यांच्या शेअर बाजारातील सूचिबद्धतेबद्दल निकष प्रस्तावित केले आहेत त्याबद्दल प्रथम सांगा.
    – विमा कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी करण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे. समभागांच्या खुल्या विक्रीपश्चात प्रवर्तकांचा भांडवली हिस्सा ५०% पेक्षा कमी असणार नाही, ही गुंतवणूकदारांसाठी समाधानाची गोष्ट म्हणावी लागेल. भारतातील विमा उद्योग हा कायम भांडवलाच्या शोधात असलेला उद्योग आहे. आजपर्यंत भांडवली बाजारात सूचिबद्धता नसल्याने या उद्योगात गुंतवणुकीपासून अनेक जण वंचित राहिले आहेत. आता सर्वसाधारण व जीवन विमा कंपन्यांचे बाजारात पदार्पण होणार असल्याने, प्रवर्तकांच्या व्यतिरिक्त अन्य गुंतवणूकदारांना विमा उद्योगात गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. तसेच विमा कंपन्यांच्या सूचिबद्धतेमुळे विमा उद्योगाला दृश्यमानता लाभेल.
  •  डिजिटलायझेशनमुळे सर्वच क्षेत्रांत व्यवसाय पद्धतीत बदल झाले आहेत. या संदर्भात विमा क्षेत्राबद्दल तुमची निरीक्षणे काय आहेत?
    – सध्या जीवनशैली अतिशय वेगवान झाली आहे. अनेक गोष्टी वेगाने बदलत आहेत. या बदलाशी जुळवून घेण्यासाठी उद्योगांना आपल्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीत बदल करणे अनिवार्य झाले आहे. आजच्या ग्राहकाला आपल्या गरजांची चांगली जाण असल्यामुळे त्याच्या गरजांची पूर्तता करू शकतील, अशाच सेवा चोखंदळपणे विकत घेण्याकडे ग्राहकाचा कल आहे. याला विमा उद्योगदेखील अपवाद नाही. आजची तरुणाई आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी समाजमाध्यमांचा मोठय़ा प्रमाणवर वापर करीत असल्यामुळे आम्ही सेवा शक्य तितक्या ऑनलाइन नेण्याचा प्रयत्न केला आहे. साहजिकच या सेवा ग्राहकापर्यंत नेण्याच्या खर्चात बचत झाली आहे. याचा फायदा केवळ कंपनीच्या प्रवर्तकांनाच नव्हे तर व्यवसायातील कर्मचारी, विमा विक्रेते, विमा नियंत्रक अन्य घटकांनाही झाला आहे. ग्राहकांसाठी तर या डिजिटलायझेशनचा खूपच फायदा झाला आहे. आमच्या कंपनीने केवळ ‘इन्शुअर’ हे अ‍ॅप विकसित केले नसून टॅब, मोबाइल, संगणक या सर्व मंचांवरून आपण कुठल्या जोखिमांचा अधीन आहोत या बाबतीत लोकांना सजग करण्याचा प्रयत्न चालविला आहे. आरोग्य, प्रवास, वाहन आदींबाबत संभवणारे धोके विमा खरेदीदाराला समजून घेणे त्यामुळे जास्त सोपे जाते. इतकेच नव्हे तर आपण दाखल केलेल्या विमा दाव्यांची कुठपर्यंत प्रगती झाली आहे, हे घरबसल्या ऑनलाइन जाणून घेणे पॉलिसीधारकाला शक्य झाले आहे.
  •  भारतात सर्वसाधारण विमा ही संकल्पना केवळ आरोग्य विम्यापुरतीच मर्यादित राहण्याची काय कारणे आहेत?
    – केवळ आरोग्य विमाच नव्हे तर कोणतेही विमा उत्पादन हे कोणीही स्वत:हून खरेदी करायला जात नाही. विमा उत्पादने खरेदी करण्यासाठी तुम्ही कोणत्या जोखिमेच्या आधीन आहात याची जाणीव कोणी तरी करून देणे गरजेचे असते. जीवन विमा काय किंवा आरोग्य विमा काय ही मार्केटिंगच्या भाषेत ज्याला ‘पुश प्रोडक्ट्स’ म्हटले जाते त्या प्रकारच्या सेवा आहेत. या सेवा आपणहून कोणी विकत घ्यायला जात नाही. जोखिमेची जाणीव व सेवा खरेदी करण्याविषयीची मानसिकता या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आज दीड-दोन कोटींचे घर खरेदी करणाऱ्याची अग्नी विमा किंवा भूकंप विमा खरेदी करण्याची नक्कीच ऐपत असते परंतु हा विमा खरेदी करण्याची मानसिकता नसते. भारतात वाढत्या नागरीकरणामुळे मागील काही वर्षांत मुंबईत २९ जुलै २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे किंवा नुकत्याच चेन्नई येथे आलेल्या पुरामुळे मागील वर्षी काश्मीर येथे झालेल्या जलप्रलयामुळे अनेकांचे नुकसान झाले परंतु विमा असलेल्या मालमत्ता व विमा नसलेल्या मालमत्ता यांच्यात मोठी दरी होती. या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या ९५% मालमत्तांचे विमे उतरलेले नव्हते. एक वेळ दारिद्रय़रेषेखालील किंवा दारिद्रय़रेषेच्या थोडे वर असलेल्या व्यक्तींनी असा विमा न घेणे एक वेळ समजण्यासारखे आहे. परंतु ऐपत असूनही विमा न घेणारे कुठल्या धोक्यांना सामोरे जात आहेत याची जाणीव त्यांना नाही. तेव्हा सर्वसाधारण विमा आरोग्य विम्यापुरता मर्यादित राहण्याला अर्थ साक्षरतेचा अभाव हेच कारण म्हणावे लागेल.