भारतीय रिझव्र्ह बँकेचे तिमाही पतधोरण नजीक येत असतानाच संभाव्य व्याजदर कपातीच्या आशेवर भांडवली बाजार दोन वर्षांच्या नव्या उच्चांकावर स्वार झाला. व्याजदराशी निगडित समभागांनी सप्ताहअखेर खरेदीचा जोर लावल्याने ‘सेन्सेक्स’ने जवळपास द्विशतकी झेप घेत मुंबई निर्देशांकाला २० हजार १०० च्याही पल्ल्याड नेऊन ठेवले.
नफेखोरीसाठी कालच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराने शतकी (१०३) घसरण नोंदविली होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळच्या सत्रात बाजार नरमच होता. पहिल्या अध्र्या तासात तर त्याने दिवसातील तळही गाठला. मात्र दुपारपूर्वीच त्यात तेजी नोंदली जाऊ लागली.
अगदी व्यवहाराच्या अध्र्या तासापूर्वीही निर्देशांक दिवसाच्या वरच्या टप्प्यावर प्रवास करीत होता. सप्ताहाच्या अखेरिस शेअर बाजार त्यापेक्षा खालच्या पातळीवर मात्र गेल्या दोन वर्षांच्या उच्चांकावर स्थिरावला.
‘सेन्सेक्स’ १७९.७५ अंश वधारणेने २०,१०३.५३ वर पोहोचला. टक्केवारीतील ही वाढ जवळपास एकाची होती. ‘निफ्टी’ही ५५.३० अंश वाढीने ६,०७४.६५ वर पोहोचला. व्याजदर कपातीची शक्यता शिगेला पोहोचल्याने सेन्सेक्ससह निफ्टी अनोख्या वरच्या टप्प्यावर पोहोचल्याचे निरिक्षण बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी नोंदविले आहे.
भारतीय रिझव्र्ह बँकेचे तिमाही पतधोरण येत्या मंगळवारी (२९ जानेवारी) जाहीर होत आहे. यंदा त्यात किमान पाव टक्क्याच्या तरी व्याजदर कपातीची अटकळ आहे. समाधानकारक महागाई दर आणि चिंताजनक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर या पाश्र्वभूमीवर हे तमाम अर्थव्यवस्थेतून अपेक्षित आहे.
त्यामुळेच भांडवली बाजारातही व्याजदराशी निगडित बँक, बांधकाम, वाहन कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाली. यामध्ये स्टेट बँक, एचडीएफसी बँक, डीएलएफ, लार्सन अॅण्ड टुब्रो, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.
सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांक हे ४.४२ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवित होते. तर प्रमुख २३ समभागांचे मूल्य वाढले. तिमाही दुप्पटीपेक्षा अधिक नफा कमाविणारा मारुती सुझुकीचा समभाग तर ४.१५ टक्क्यांनी उंचावला होता. सोबतच टाटा मोटर्सचा समभाग कालच्या तुलनेत सावरत २.५५ टक्क्यांनी वधारला.
बांधकामाबरोबरच पोलाद क्षेत्रातील समभाग वधारले. गेल्या चार सत्रात ३८ टक्क्यांनी आपटणारा एचडीआयएलचा समभाग एकाच सत्रात ११ टक्क्यांनी वधारला.
भारतीय मोबाईलधारक.. सीडीएमए आणि जीएसएम तंत्रज्ञानावरील मोबाईलधारकांची भारतातील संख्या २०१२ अखेर एकूण ९१.९१ कोटींच्या पुढे गेली आहे. यामध्ये सीडीएमएधारकांची संख्या १०.५१ तर जीएसएमधारकांची संख्या ८१.४० कोटी आहे. वर्षभरात देशात मोबाईलधारक १०.७६ कोटींनी वधारले आहेत.
