नवी दिल्ली : झी एंटरटेन्मेंट एंटरप्राइझेसच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून पुनीत गोएंका यांची हकालपट्टी आणि भागधारकांच्या विशेष सभेच्या मागणीवरून दीर्घकाळ चाललेल्या संघर्षांनंतर झी एंटरटेन्मेंटमधील सर्वात मोठा भागीदार असणाऱ्या इन्व्हेस्कोने मध्यंतरी, गेल्या महिन्यात तिची भूमिका सौम्य केल्याचे संकेत दिले, तर बुधवारी कंपनीमधील हिस्सेदारी कमी करत असल्याचा निर्णय जाहीर केला.

इन्व्हेस्को डेव्हलिपग मार्केट्स फंडासह त्यांच्यातर्फे व्यवस्थापित करण्यात येणारे तीन फंड हे ‘झी’मधील ७.८ टक्के समभागांची विक्री करणार आहेत. कंपनी ७.४ कोटी समभाग विकणार असून त्यातून सुमारे २,२०० कोटी रुपयांचा निधी मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र या हिस्सा विक्रीनंतर इन्व्हेस्कोच्या तीनही फंडाची ‘झी’मध्ये ११ टक्के हिस्सेदारी राहणार आहे.

गेल्या महिन्यात इन्व्हेस्कोने विरोधाचा पवित्रा बदलत, तिचे झी-सोनी विलीनीकरण कराराला समर्थन असल्याचे घोषित केले होते. तसेच झीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत गोएंका, व्यवस्थापकीय संचालकांना काढून टाकण्यासाठी भागधारकांची विशेष सभा बोलविण्याचा निर्णय देखील मागे घेत असल्याचे इन्व्हेस्कोने जाहीर केले होते.

‘झी’च्या समभागात घसरण

इन्व्हेस्कोने झी एंटरटेन्मेंटमधील हिस्सेदारी कमी केल्याने त्याचे नकारात्मक पडसाद झी एंटरटेन्मेटच्या समभाग मूल्यांत उमटले. गुरुवारी दिवसअखेर हा समभाग बीएसईवर २.११ टक्क्यांनी घसरून २८४.८५ रुपयांवर बंद झाला. दिवसभरातील व्यवहारात समभागाने २८३.३० रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती.