मुंबई : सध्या व्याजाचे दर कमी झाल्याने ‘ओपन एन्डेड डेट इंडेक्स फंड’ गुतंवणूकदारांना निश्चित मुदतपूर्तीसह बँकांपेक्षा सरस व्याजासह स्थिर परताव्याची संधी देतात. या स्वरूपाचे दोन रोखेसंलग्न फंड सध्या गुंतवणुकीसाठी खुले झाले आहेत.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियलकडून ‘पीएसयू बॉण्ड इंडेक्स फंड’

मुंबई : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने ‘पीएसयू बॉण्ड प्लस एसडीएल ४०-६० इंडेक्स फंड’ सादर केला आहे. १६ सप्टेंबरपासून गुंतवणुकीस खुल्या झालेल्या फंडात येत्या २७ सप्टेंबरपर्यंत किमान एक हजार रुपयांपासून पुढे गुंतवणूक करता येणार आहे. 

या योजनेतील निधी ‘निफ्टी ५० पीएसयू बॉण्ड प्लस एसडीएल’ या रोखे निर्देशांकातील घटकांमध्ये गुंतविली जाणार असून मुदतपूर्ती (मॅच्युरिटी) डिसेंबर २०२७ मध्ये असेल. फंडातील गुंतवणूक ४०-६० या तत्त्वानुसार विभाजित केली जाणार असून फंडातील एकूण रकमेच्या ४० टक्के  रक्कम सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या रोख्यांमध्ये आणि ६० टक्के गुंतवणूक ‘एसडीएल’मध्ये अर्थात राज्य विकास कर्जात (स्टेट लोन डेव्हलपमेंट) गुंतविली जाणार आहे.

हा एक कायम गुंतवणुकीस खुला असलेला व निश्चित मुदतपूर्ती इंडेक्स फंड असून यात सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि एसडीएलमधील गुंतवणुकीचा तिमाही आढावा घेतला जाईल. गुंतवणूकदारांना आठ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे रोखे आणि २० एसडीएलमध्ये गुंतवणुकीची संधी मिळेल. हे ‘एसडीएल’ राज्य सरकार आणि केंद्रशासित राज्यांचे असतील, अशी माहिती आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे उत्पादन प्रमुख चिंतन हरिया यांनी दिली.

आदित्य बिर्लाकडून ‘निफ्टी एसडीएल प्लस पीएसयू बॉण्ड इंडेक्स फंड’ 

मुंबई: आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडाने ‘निफ्टी एसडीएल प्लस पीएसयू बॉण्ड इंडेक्स फंड’ बाजारात प्रस्तुत केला आहे. १५ सप्टेंबरपासून खुल्या झालेल्या या फंडात २३ सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. फंडातील ६० टक्के  गुंतवणूक राज्य विकास कर्ज निधीत (एसडीएल) तर ४० टक्के  सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या रोख्यांमध्ये केली जाईल. 

ही एक गुंतवणुकीस कायम खुली (ओपन एन्डेड) योजना असून मुदतपूर्ती सप्टेंबर २०२६ मध्ये होईल. फंडाच्या गुतंवणुकीत ६० टक्के हिस्सा ‘एसडीएल’मध्ये अर्थात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्य विकास कर्जात केली जाईल. उर्वरित ४० टक्के  निधी ‘एएए’ मानांकन असणाऱ्या दहा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या रोख्यांमध्ये गुंतविण्यात येईल. ही गुंतवणूक पत गुणवत्ता आणि तरलता गुणांकांच्या आधारे केली जाईल. 

आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बालासुब्रमणियन यांच्या मते, अल्प आणि मध्यम मुदतीच्या गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाच वर्षे हा एक आकर्षक कालावधी आहे. सरकारी रोख्यांच्या तुलनेत ‘एसडीएल’ हे अधिक आकर्षक आहेत. एसडीएल आणि ‘एएए’ मानांकित पीएसयू बॉण्ड्स योग्य रूपात पारंपरिक बचत साधनांपेक्षा चांगला परतावा देऊ  शकतात.