‘फेड’च्या निर्णयाबाबत सावधगिरी; ‘सेन्सेक्स’ची सहा शतकी आपटी | Investors are cautious in the background of the upcoming meeting of the US Federal Reserve amy 95 | Loksatta

‘फेड’च्या निर्णयाबाबत सावधगिरी; ‘सेन्सेक्स’ची सहा शतकी आपटी

अमेरिकी फेडरल रिझव्र्हच्या आगामी बैठकीच्या पाश्र्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबिला, त्या परिणामी देशांतर्गत भांडवली बाजारातील सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर बुधवारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले.

sensex

मुंबई : अमेरिकी फेडरल रिझव्र्हच्या आगामी बैठकीच्या पाश्र्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबिला, त्या परिणामी देशांतर्गत भांडवली बाजारातील सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर बुधवारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले. प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’मध्ये ६०० अंशांहून अधिक घसरण होऊन, त्याने ६१,००० अंशांची पातळी मोडली आहे तर निफ्टी १८,०५० अंशांखाली गडगडला.

दिवसअखेर सेन्सेक्समध्ये ६३६.७५ अंशांची (१.०४ टक्के) घसरण होऊन तो ६०,६५७.४५ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने ६०,५९३.५६ अंशांची नीचांकी तर ६१,३२७.२१ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे निफ्टीमध्ये १८९.६० अंशांची (१.०४ टक्के) घसरण झाली आणि तो १८,०४२.९५ पातळीवर बंद झाला.

जागतिक पातळीवरील प्रतिकूलतेमुळे जगभरातील प्रमुख भांडवली बाजारात घसरण झाली. त्याचेच पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्र्हच्या बैठकीमुळे व्याजदरात अतिरिक्त वाढीची शक्यता वर्तवली जात असून, तिची आक्रमक भूमिका कायम राहण्याची राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त गुंतवणूकदारांनी देशांतर्गत पातळीवर कंपन्यांच्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीवर लक्ष केंद्रित केले आहे, असे जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

सेन्सेक्समध्ये टाटा स्टीलचा समभाग सर्वाधिक सक्रिय राहिला. त्यात सर्वाधिक २.३२ टक्क्यांची घसरण झाली, त्यापाठोपाठ पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, विप्रो, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचचे समभाग नकारात्मक पातळीत स्थिरावले. तर सेन्सेक्समधील मारुती सुझुकी आणि टीसीएस या केवळ दोन कंपन्यांचे समभाग किरकोळ वाढीसह बंद झाले.

रुपया ऐतिहासिक नीचांकातून सावरला
मुंबई: डॉलरच्या तुलनेत रुपयाने मंगळवारच्या सत्रात २२ पैशांनी घसरून ८३ रुपयांची ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली होती, मात्र बुधवारच्या सत्रात खनिज तेलाच्या दरातील घसरणीमुळे रुपयाने पुन्हा ऐतिहासिक नीचांकापासून १८ पैशांची उभारी घेत ८२.८२ पातळीवर बंद झाला. जागतिक पातळीवर खनिज तेलाचे दर बुधवारच्या सत्रात २.१३ टक्क्यांनी घसरून ८०.३५ डॉलर प्रति पिंपावर पोहोचले आहेत. चलन बाजारातील तज्ज्ञांच्या मते, भांडवली बाजारातील पडझड आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून निधीचे निर्गमन सुरू असल्याने रुपयात घसरण झाली. मात्र रिझव्र्ह बँकेच्या चलन बाजारातील हस्तक्षेपामुळे पुन्हा तो सावरला. बुधवारच्या सत्रात ८२.८७ या पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली आणि दिवसभरातील सत्रात त्याने ८२.७४ या उच्चांकी तर ८२.९१ या नीचांकी पातळीला स्पर्श केला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 01:53 IST
Next Story
‘गूगल’ला १० टक्के दंड रक्कम भरण्याचे आदेश; दंड स्थगितीची मागणी न्यायाधिकरणाने फेटाळली!