करोनाचा नवीन विषाणू ओमायक्रॉनच्या बाधित रुग्णांच्या संख्येत देशात वाढ होत असल्याने भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी मोठा धसका घेतल्याने सोमवारी सर्वच क्षेत्रात चौफेर विक्रीचा मारा झाला. सकाळच्या सत्रात सुरू झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे प्रमुख निर्देशांकांमध्ये दीड टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

भीती आणि अनिश्चिाततेच्या वातावरणात सरलेल्या दिवसात, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९४९.३२ अंशाच्या घसरणीसह ५६,७४७.१४ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २८४.४५ अंशांची घसरण झाली. हा निर्देशांक दिवसअखेर १७,००० अंशांची पातळी मोडत १६,९१२.२५ पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्स निर्धारित करणाऱ्या समभागांत, इंडसइंड बँक ४ टक्क्यांची सर्वात मोठी घसरण नोंदविली. त्यापाठोपाठ बजाज फिनसव्र्ह, भारती एअरटेल, टीसीएस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रच्या समभागांमध्ये घसरण झाली. सोमवारच्या सत्रात सेन्सेक्समध्ये सर्व कंपन्यांचे समभाग नकारात्मक पातळीवर बंद झाले.

भांडवली बाजारात दिवसाची सुरुवात घसरणीने झाली. दुपारच्या सत्रात निर्देशांकांमध्ये सर्वाधिक योगदान राखणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांच्या समभागात विक्रीचा जोर अधिक वाढल्याने जवळपास सर्व क्षेत्रीय निर्देशांक नकारात्मक पातळीवर बंद झाले.

नव्या विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे संभाव्य अनिश्चिाततेची स्थिती लक्षात घेऊ न रिझर्व्ह बँक व्याजदराबाबत काय भूमिका घेते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान मंदीवाल्यांची पकड अधिक घट्ट केल्याने भांडवली बाजारात निफ्टीने १७,००० अंशांची पातळी मोडली आहे. भांडवली बाजारात विक्रीचा दवाब कायम आहे, असे निरीक्षण एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख एस रंगनाथन यांनी नोंदवले.

‘आयपीओ’मधून ५२,७५९ कोटींची विक्रमी निधी उभारणी – सीतारामन

 भांडवली बाजारातून चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबरपर्यंत ६१ कंपन्यांनी प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून ५२,७५९ कोटींचा विक्रमी निधी उभारला. गेल्या आर्थिक वर्षात आयपीओच्या माध्यमातून उभारलेल्या निधीपेक्षा चालू वर्षात अधिक उभारणी करण्यात आली आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले. भाग विक्रीच्या माध्यमातून लहान आणि मध्यम श्रेणीतील कंपन्यांनादेखील निधी उभारणीसाठी पोषक राहिले. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबरपर्यंत बाजारात आलेल्या ६० कंपन्यांपैकी ३४ कंपन्या या लघू आणि मध्यम (एसएमई ) प्रकारातील होत्या. गेल्या आर्थिक वर्षात ५६ कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून ३१,०६० कोटी रुपयांचा निधी उभारला होता, त्यामध्ये २७ कंपन्या या एसएमई श्रेणीतील होत्या. चालू आर्थिक वर्षात उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील अनेक कंपन्या भांडवल उभारणीसाठी पुढे  येत आहेत.