मुंबई : रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेचे आणि खनिज तेलाच्या वाढत्या दरांचे भांडवली बाजारावर प्रतिकूल परिणाम उमटले आहेत. जगभरातील भांडवली बाजारांमध्ये अस्थिरतेचे वातावरण असल्यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत विक्रीचा मारा सुरू ठेवला आहे. परिणामी फेब्रुवारी महिन्यात बाजारात झालेल्या समभाग विक्रीमुळे गुंतवणूकदारांनी २९ लाख कोटी रुपयांची मत्ता गमावली आहे.

मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवल २ फेब्रुवारीला २७०.६ लाख कोटी रुपये होते. ते आता २४१.२ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी गमावलेली रक्कम युक्रेनच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षाही (जीडीपी) अधिक आहे. तसेच गेल्या तीन सत्रांमध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देशांतर्गत भांडवली बाजारातून सुमारे १७ हजार कोटी रुपयांचा निधी बाजारातून काढून घेतला आहे. परिणामी प्रमुख निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठी पडझड सोसली आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २ ते ४ मार्च या तीन सत्रांदरम्यान समभागांतून १४,७२१ कोटी रुपये, रोखे बाजारातून २,८०८ कोटी रुपये आणि हायब्रिड साधनांमधून ९ कोटी रुपये काढले आहेत. बाजारातून एकूण १७,५३७ कोटी रुपयांच्या निधीचे निर्गमन झाले आहे. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हकडून आगामी काळात व्याजदरात वाढ होण्याची शक्यता असल्याने परदेशी गुंतवणुकीचे देशाबाहेर निर्गमन सुरू आहे.

परकी गुंतवणुकीची भारताकडे पाठ 

फेब्रुवारी २०२२ मध्ये भारत वगळता इंडोनेशिया, फिलिपाइन्स, दक्षिण कोरिया आणि थायलंडसारख्या उदयोन्मुख बाजारपेठ असलेल्या देशांमध्ये  गुंतवणुकीचा प्रवाह सकारात्मक राहिला आहे. या बाजारपेठांमध्ये – इंडोनेशियामध्ये १२.२० कोटी डॉलर, फिलिपाइन्समध्ये १४.१ कोटी डॉलर, दक्षिण कोरिया ४१.८ कोटी डॉलर आणि थायलंडमध्ये १९.३१ कोटी डॉलरची गुंतवणूक झाली आहे. युक्रेनवर चालू असलेल्या रशियन आक्रमणामुळे आणि रशियावरील आर्थिक निर्बंध, उच्च महागाई दर आणि फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता यामुळे येत्या काही महिन्यांत परकी गुंतवणुकीचा प्रवाह अस्थिर राहण्याची शक्यता आहे.