scorecardresearch

नव्याने सूचिबद्ध कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना दोन लाख कोटींचा फटका

डिजिटल वित्तीय सेवा क्षेत्रातील ‘पेटीएम’च्या समभागाने गुंतवणूकदारांची सूचिबद्धतेलाच मोठी निराशा केली.

मुंबई : गेल्या आठवडय़ाभरात झालेल्या भांडवली बाजारातील घसरणीमुळे भांडवली बाजारातील नव्याने पदार्पण केलेल्या नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाधारित क्षेत्रातील ‘पेटीएम’, नायका, पॉलिसीबझार, कारट्रेड टेक यांसारख्या नवउद्यमी कंपन्यांच्या समभागात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांच्या दोन लाख कोटी रुपयांचे मूल्य ऱ्हास सोसावा लागला आहे.

सरलेल्या वर्षांत तेजीवर स्वार झालेल्या भांडवली बाजारातील पोषक वातावरणाचा फायदा घेत, जानेवारी २०२१ पासून ६३ कंपन्यांनी प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून १,१८,७०४ कोटींचा विक्रमी निधी उभारला आहे. त्यातही नव्याने पदार्पण करणाऱ्या नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाधारित नवउद्यमी कंपन्यांचे ‘आयपीओ’ गुंतवणूकदारांचा उमदा प्रतिसाद मिळवीत यशस्वी ठरले. तोटय़ात असूनदेखील या कंपन्या मोठा निधी उभारण्यास यशस्वी ठरल्याच, शिवाय काही अपवाद केल्यास त्यांच्या समभागांनी सूचिबद्धतेला मोठे अधिमूल्यही मिळविले होते. मात्र सूचिबद्धतेनंतर साधारण गेल्या महिन्यापासून या समभागात तीव्र स्वरूपाची घसरण सुरू आहे. 

डिजिटल वित्तीय सेवा क्षेत्रातील ‘पेटीएम’च्या समभागाने गुंतवणूकदारांची सूचिबद्धतेलाच मोठी निराशा केली. कंपनीच्या समभागाच्या भांडवली बाजारातील पदार्पणातच गुंतवणूकदारांनी ‘आयपीओ’च्या माध्यमातून २,१५० रुपयांना मिळालेल्या किमतीपासून १६ टक्के खाली सूचिबद्ध झाला. तर सध्या कंपनीचा समभाग ९१७ रुपयांवर व्यवहार करीत आहे. प्रारंभिक विक्रीनंतर निश्चित केलेल्या समभागाच्या वितरण किमतीपासून समभागात ५७ टक्के घसरण झाली आहे. तर सोमवारच्या सत्रात घरोघरी खाद्यपदार्थाचा बटवडा करणारे व्यासपीठ असलेल्या झोमॅटोचा समभाग २० टक्क्यांनी कोसळला आहे. नायकाने देखील १,६९३ रुपयांच्या आतापर्यंतचा नीचांकी तळ गाठला आहे. मात्र अजूनही नायका आणि झोमॅटो हे दोन्ही समभाग आयपीओच्या वेळी निर्धारित वितरण किमतीपेक्षा अधिक पातळीवर व्यवहार करत आहेत.

तब्बल ४१ टक्क्यांची वाताहत

सरलेल्या वर्षांत सूचिबद्ध झालेल्या सहा नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाधारित नवउद्यमी कंपन्यांच्या समभागात झालेल्या घसरणीमुळे कंपन्यांनी सूचिबद्ध झाल्यापासून १.२० लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल गमावले आहे. याला फक्त नजारा टेकचा समभाग अपवाद ठरला असून त्याने बाजार भांडवलात ३,००० कोटींची मूल्यवृद्धी केली आहे. कार ट्रेडचा समभाग २० ऑगस्ट रोजी सूचिबद्ध झाला होता त्याने सुमारे ३,००० कोटी म्हणजेच ४८ टक्के बाजार भांडवली मूल्य गमावले आहे. त्याबरोबरच १० डिसेंबरला सूचिबद्ध झालेला स्टार हेल्थने ७,००० कोटी रुपये (१४ टक्के), १५ नोव्हेंबरला सूचिबद्ध झालेल्या पॉलिसीबझारने १९,००० कोटी रुपये (३५ टक्के), १० नोव्हेंबरला सूचिबद्ध झालेल्या नायकाने (एफएसएन ई-कॉम) २२,००० कोटी रुपये (२१ टक्के), २३ जुलैला सूचिबद्ध झालेल्या झोमॅटोने २७,००० कोटी रुपये (२७ टक्के) बाजार भांडवली मूल्य गमावले आहे. या घसरणीमध्ये १८ नोव्हेंबरला सूचिबद्ध झालेला ‘पेटीएम’चा समभाग आघाडीवर असून ४२ हजार कोटी रुपयांहून अधिक (४१ टक्के) भांडवल गमावले आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Investors lost over two lakh crore for investing in newly listed companies zws

ताज्या बातम्या