सेन्सेक्स, निफ्टीची तेजीची गुढी

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एकाच व्यवहारात तब्बल १,८६१.७५ अंश वाढीने २८,५३५.७८ वर

संग्रहित छायाचित्र
प्रमुख निर्देशांकांची दशकातील सर्वोत्तम सत्रउसळी; जागतिक भांडवली बाजाराला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

तेजीच्या प्रवासावर निघालेले जागतिक भांडवली बाजार तसेच करोना संकटावर मात करण्यासाठी भारतात सरकारकडून व्यक्त होत असलेल्या अर्थ सहाय्याच्या अपेक्षेवर सेन्सेक्स व निफ्टीने बुधवारी लक्षणीय वाढ नोंदविली. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी मंगळवारच्या तुलनेत जवळपास ७ टक्के उसळी घेत दशकातील सर्वोत्तम सत्रझेप घेतली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एकाच व्यवहारात तब्बल १,८६१.७५ अंश वाढीने २८,५३५.७८ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सत्रअखेर ५१६.८० अंश वाढीमुळे ८,३१७.८५ पर्यंत स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रिज थेट १५ टक्क्य़ांपर्यंत उसळला. त्याचबरोबर कोटक महिंद्र बँक, मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक व एचडीएफसी लिमिटेड, टायटन कंपनी, लार्सन अँड टुब्रो, अ‍ॅक्सिस बँक आदींचेही समभाग मूल्य वाढले.

मुंबई शेअर बाजारातील सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीच्या यादीत स्थिरावले. त्यात ऊर्जा, वित्त, बँक, वाहन, तेल व वायू निर्देशांक १० टक्क्य़ांपर्यंत वाढले. मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये ३.५३ टक्क्य़ांपर्यंत भर पडली.

दरम्यान, गुढीपाडव्यानिमित्त परकीय चलन विनिमय व्यवहार बंद होते.

भांडवली बाजार बंद ठेवा – दलाली पेढी संघटना

करोनाच्या वाढत्या प्रसारामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीतून वगळण्यात आलेल्या भांडवली बाजार व वायदे बाजाराशी संबंधित दलाली पेढय़ांतील कर्मचारी, मालकांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यात अडचण येत आहे. परिणामी सर्व भांडवली बाजार येत्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवावेत, अशी मागणी दलाली पेढय़ांच्या संघटनांनी केली आहे. देशातील सर्व राज्यांनी भांडवली बाजाराचे व्यवहार हे अत्यावश्यक सेवेत अंतर्भूत केले नसल्याने सर्व व्यवहार बंद ठेवावेत, अशी मागणी खुद्द भांडवली बाजाराच्या संघटनेनेही सेबीकडे केली आहे.

दरम्यान अनेक दलाली पेढय़ांनी नवीन सौदे स्विकारणे बंद केले आहे.

सेबीने , भांडवली रोखे आणि वायदा बाजाराशी संबिंधत संस्थांना अशा बंदीमधून वगळण्यात आल्याचे अधिसूचना काढून स्पष्ट केले. या अधिसूचनेची माहिती स्थानिक पोलिसांना नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना आपापल्या कार्यालयात पोहोचण्यास अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे कमोडिटी मार्केट पार्टिसिपन्ट असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे.

वित्त व्यवहार सुरूच राहतील; कर्मचाऱ्यांसाठी सुविधा करा – सेबी

संचारबंदी कालावधीत अत्यावश्यक सेवा म्हणून जाहीर करण्यात आलेले भांडवली तसेच वायदे बाजारातील व्यवहार नियमित सुरू राहणार असून या व्यवसायाशी संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात सुरक्षित पोहोचता यावे यासाठी राज्यांनी पुरेशी सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे सेबीने म्हटले आहे. विविध राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश व्यवस्थापनाला पाठविण्यात आलेल्या पत्रात भांडवली बाजार नियामकाने, भांडवली बाजार, म्युच्युअल फंड, बँका आदी आस्थापना सुरूच राहतील, असे स्पष्ट केले आहे.

भांडवली बाजार अशी सूचना न देता बंद करता येत नाहीत. बाजार बंद केल्यामुळे होणारे नुकसान प्रचंड असते. अशा परिस्थितीत बाजार सुरु ठेवणे आवश्यक आहे.

– उदय तारदळकर, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या दलालांच्या संघटनेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Investors response to global capital markets abn