scorecardresearch

‘आयपीओ’ बाजारातील उन्माद ‘सेबी’ अध्यक्षांचा सावधगिरीचा इशारा

भांडवली बाजारात नवीन गुंतवणूकदारांची सतत भर पडते आहे.

‘आयपीओ’ बाजारातील उन्माद ‘सेबी’ अध्यक्षांचा सावधगिरीचा इशारा

मुंबई : प्रारंभिक सार्वजनिक भागविक्रीवर अलीकडच्या काळात सामान्य गुंतवणूकदारांच्या पडत असलेल्या उड्यांबाबत सावधगिरीचा इशारा देत, भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’चे अध्यक्ष अजय त्यागी यांनी या प्रक्रियेतील किंमत संशोधनाची प्रक्रिया तितकीशी पारदर्शक आणि प्रभावी नसल्याचे मत गुरुवारी येथे व्यक्त केले.

भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) आयोजित केलेल्या १२व्या भांडवली बाजारविषयक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यागी यांनी किरकोळ गुंतवणूकदारांनी दुय्यम बाजारातील नामांकित सूचिबद्ध कंपन्यांकडे गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहणे अधिक हितावह ठरेल, असे सूचित केले. आधीच सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांबाबत पुरेशी माहिती उपलब्ध असण्याबरोबरच, त्यांच्याकडून वेळोवेळी प्रकटनातून खुलासाही केला जात असतो, याकडे त्यागी यांनी लक्ष वेधले.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून कंपन्यांनी गोळा केलेला निधी आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये उभारलेल्या निधीच्या जवळपास समान पातळीवर आहे. गेल्या आर्थिक वर्षात प्राथमिक बाजारातून कंपन्यांनी ४६,००० कोटी रुपयांचा निधी उभारला होता. याव्यतिरिक्त या माध्यमातून विविध कंपन्यांना एकूण ३०,००० कोटी रुपयांचा निधी उभारण्याची ‘सेबी’ने परवानगी दिली आहे. गेल्या १८ महिन्यांच्या काळात तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी या माध्यमातून १५,००० कोटी उभारले आहेत.

भांडवली बाजारात नवीन गुंतवणूकदारांची सतत भर पडते आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये दर महिन्याला सरासरी ४ लाख नवीन ‘डिमॅट’ खाती उघडण्यात आली. तर २०२०-२१ आर्थिक वर्षात महिन्याला १२ लाख खाती उघडली गेली. तर चालू आर्थिक वर्षात हे प्रमाण महिन्याला सरासरी २६ लाख खाती इतके वाढले आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2021 at 00:16 IST
ताज्या बातम्या