‘आयआरबी इन्फ्रा’कडून ५,३४७ कोटींची भांडवल उभारणी

सिंगापूरच्या जीआयसीशी संलग्न ब्रिकलेयर्स इन्व्हेस्टमेंट प्रा.लि. यांना हे समभाग विकले जाणार आहेत.

मुंबई : देशातील सर्वात मोठी रस्ते विकासक असलेल्या आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडने प्राधान्यतेने भांडवली समभाग वितरणाच्या दोन स्वतंत्र व्यवहारांद्वारे ५,३४७ कोटी रुपयांचा निधी उभारणी प्रस्तावित केली आहे.

आयआरबी इन्फ्राकडून स्पेनच्या पायाभूत विकास क्षेत्रातील अग्रणी फेरोव्हायलची उपकंपनी सिन्त्रा आयएनआर इन्व्हेस्टमेंट बीव्ही आणि सिंगापूरच्या जीआयसीशी संलग्न ब्रिकलेयर्स इन्व्हेस्टमेंट प्रा.लि. यांना हे समभाग विकले जाणार आहेत.

सिन्त्राच्या माध्यमातून आयआरबीमध्ये ३,१८० कोटी रुपयांची भागभांडवली गुंतवणूक येणार असून, ती आयआरबीमधील प्रवर्तकानंतरची सर्वात मोठी २४.९ टक्क्य़ांची भागधारक असेल. जीआयसीकडून २,१६७ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, १६.९ टक्के भागभांडवली हिस्सा असेल.

कंपनीकडून उभारल्या जाणाऱ्या एकूण ५,३४७ कोटींच्या गुंतवणुकीपैकी ३,२५० कोटी रुपयांचा विनियोग कंपनीकडून कर्जफेडीसाठी, तर १,४९७ कोटी रुपये वर्तमान आणि भविष्यातील संधींसाठी विकास भांडवल म्हणून वापरात येणार आहे.

समभागांची १० टक्क्य़ांनी आपटी

*  प्रस्तावित दोन्ही प्राधान्यतेने समभाग विक्रीसाठी विद्यमान बाजारभावाच्या तुलनेत २८ टक्के सवलतीसह प्रति समभाग २११.७९ रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. शिवाय प्रवर्तकांचा हिस्साही सौम्य होणार असल्याची भांडवली बाजारात बुधवारी नकारात्मक प्रतिक्रिया उमटली.

आयआरबी इन्फ्राचे संस्थापक प्रवर्तक वीरेंद्र डी. म्हैसकर यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, या व्यवहारांच्या पूर्ततेनंतर प्रवर्तक आणि वैयक्तिक सर्वाधिक मोठे भागधारक तेच असतील. या व्यवहारांपश्चात म्हैसकर यांचा आयआरबीमधील भागभांडवली हिस्सा ३४ टक्के इतका राहणार असून कंपनीचे व्यवस्थापकीय नियंत्रण त्यांच्याकडेच राहील.

आयआरबी इन्फ्राचा समभाग मंगळवारच्या २९४.४० रुपये या बंद भावाच्या तुलनेत बुधवारी दिवसअखेर १० टक्के घसरणीसह २६३.१५ रुपयांवर स्थिरावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Irb infra to raise rs 5347 crore from ferrovial and gic zws

Next Story
जैवतंत्रज्ञान पिकांच्या कृषी संशोधनावरील स्थगिती
ताज्या बातम्या