scorecardresearch

वाहनाचा जितका वापर तितकाच विम्याचा खर्च ; पूरक पॉलिसीसाठी ‘इर्डा’ची अनुकूलता 

या टेलिमॅटिक्स-आधारित मोटार विमा योजनांमध्ये वाहनाचा वापर किंवा वाहन चालविण्याच्या वर्तनावर विमा हप्तय़ाचा दर अवलंबून असेल.

new motor insurance policy,
(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : विमा क्षेत्राची नियामक ‘इर्डा’ने बुधवारी सामान्य विमा कंपन्यांना मोटार विमा पॉलिसीसाठी सुरचित पूरक पॉलिसी आणण्याला परवानगी दिली. या टेलिमॅटिक्स-आधारित मोटार विमा योजनांमध्ये वाहनाचा वापर किंवा वाहन चालविण्याच्या वर्तनावर विमा हप्तय़ाचा दर अवलंबून असेल.

मोटार विम्याची संकल्पना सतत विकसित होत आहे. तंत्रज्ञानाच्या अवलंबाने विमा क्षेत्राला नव्या पिढीच्या गरजा आणि अपेक्षांची गतिमानाने दखल घेण्याइतके सक्षम बनविले आहे. सामान्य विमा क्षेत्राने बदलत्या काळाशी आणि पॉलिसीधारकांच्या गरजांशी जुळवून घेणे आवश्यक आहे, असे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात ‘इर्डा’ने या संबंधाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हे विमा कवच प्रचलित मूलभूत मोटार विमा पॉलिसीमध्ये (मोटर ओन डॅमेज) पूरक अर्थात अ‍ॅड-ऑन म्हणून प्रदान केले जाईल आणि ते देशातील मोटार विम्याला चालना देण्यास मदतकारक ठरेल असा विश्वास ‘इर्डा’ने व्यक्त केला आहे.

दरम्यान, एडेल्वाइस जनरल इन्शुरन्सने मोबाईल टेलीमॅटिक्स-आधारित मोटार विमा पॉलिसी सुरू केल्याचे बुधवारी जाहीर केले. पॉलिसीधारकाच्या वाहनाच्या वापरावर या विम्याचा हप्ता अवलंबून असेल. वापरावर आधारित या प्रारूपाद्वारे मोबाइल अ‍ॅपद्वारे वाहन चालल्याचे प्रमाण आणि गुणवत्ता दोन्ही मोजली जाते आणि त्यानुसार हप्तय़ाची गणना होते. सध्याच्या वार्षिक सरसकट हप्तय़ाच्या विपरीत, ग्राहक या पॉलिसीमध्ये वापरानुसार हप्तय़ाची रक्कम मासिक स्वरूपात भरू शकतील. 

नवीन बदल काय ?

* तंत्रज्ञानसमर्थ विम्याचे कवच सुलभ करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून, ‘इर्डा’ने सामान्य विमा कंपन्यांच्या प्रचलित ‘मोटर ओन डॅमेज’ (ओडी) कवचाला तंत्रज्ञान-सक्षम पूरकतेची जोड देऊ केली आहे.

* यातून जितके वाहन चालविले जाईल आणि वाहनधारकाच्या वाहन-चालनाच्या वर्तनावर आधारित विम्याचा दर ठरविला जाईल. सध्याच्या घडीला विमा कंपन्यांकडून वाहनाच्या प्रकारानुसार मोटार विम्याचा हप्ता सरसकट सर्वच ग्राहकांना एकसारखा आकारला जातो.

* एकाच्याच मालकीची दुचाकी आणि कार असेल तर, अशा ग्राहकाला दोन्ही वाहनांसाठी संयुक्त चल विमापत्र (फ्लोटर पॉलिसी) तुलनेने सवलतीच्या दरात मिळविण्याची सोय असेल.

विशेषत: सध्याच्या घरून काम करण्याच्या प्रवाहामुळे, वाहनाचा वापर कमी आणि मर्यादित बनलेल्या ग्राहकांसाठी विम्याचा खर्च किफायती बनविणारा हा प्रस्ताव आहे. शिवाय विमा हप्तय़ाबाबत पारदर्शकता आणली जाऊन वाहनधारकांचेच हप्तय़ाच्या दरावर नियंत्रण यातून येईल 

उदयन जोशी, अध्यक्ष जोखीमांकन व पुनर्विमा, लिबर्टी जनरल इन्शुरन्स

भविष्यकाळाकडे दृष्टी असणारी कंपनी या नात्याने, आम्ही गेल्या वर्षी सँडबॉक्स उत्पादनांद्वारे वापर आणि वर्तन-आधारित मोटार विम्यासारखीच संकल्पना सादर केली होती. हे प्रारूप किफायतशीर, भविष्यवादी असण्याबरोबरच, वाहन चालनाच्या चांगल्या व शिस्तशीर वर्तनाला पाठबळ देणारा ठरेल.

राकेश जैन, मुख्याधिकारी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स

एकाच पॉलिसीअंतर्गत अनेक वाहनांना विमा कवच मिळविण्याची सोय होणार असल्याने, प्रत्येकासाठी वैयक्तिक पॉलिसी ठेवण्याची आणि त्याच्या नूतनीकरणाबाबत पाठपुराव्याची गरज राहणार नाही. एकूण वाहन विम्याची लोकप्रियता व व्याप्ती वाढविणारे हे स्वागतार्ह पाऊल आहे.

सुशील तेजुजा, संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, पॉलिसीबॉस डॉट कॉम

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Irdai permit general insurers to introduce telematics motor insurance policy zws

ताज्या बातम्या