जेट एअरवेजवरील बाजारहिस्सा कमी होण्याबरोबरच कर्जाचा बोजा विस्तारत चालला आहे; मात्र इतिहादमुळे कंपनीवरील कर्ज सध्याच्या २.१ अब्ज डॉलरवरून १.५ अब्ज डॉलरवर येईल, असा विश्वास व्यक्त केला गेला आहे. संयुक्त अरब अमिरातमधील इतिहादने कंपनीतील २४ टक्के हिस्सा २,०५८ कोटी रुपयांना खरेदी करण्याच्या प्रस्तावाला जेट एअरवेजच्या भागधारकांनी मंजूरी दिली आहे. याबाबत बोलाविण्यात आलेल्या विशेष वार्षिक सर्वसाधारण सभेत भारतीय हवाई क्षेत्रातील या विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढीवर औपचारिक शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, कंपनीचे समभाग मूल्य भांडवली बाजारावर ४ टक्क्यांनी आपटले. तर कंपनीने सायंकाळी विस्तारित तोटय़ाचे तिमाही निष्कर्षही जाहिर केले. यानुसार कंपनीला मार्च २०१३ अखेर २९८.१२ कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. २०१२-१३ या आर्थिक वर्षांतील तोटा मात्र वर्षभरापूर्वीच्या ४८५.५० कोटी रुपयांवर आणण्यात यश आले आहे.