‘जेट’ उड्डाणस्थगनानंतर.. विमान समभागांत उलथापालथ

जेट एअरवेजची उड्डाणे बुधवारी मध्यरात्रीपासून संस्थगित झाली.

(संग्रहित छायाचित्र)
जेट एअरवेज गडगडला, तर लाभार्थी स्पाइसजेट

मुंबई : भारताच्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी जेट एअरवेजची उड्डाणे बुधवारी मध्यरात्रीपासून संस्थगित झाली. या  घडामोडीने भांडवली बाजारात सूचिबद्ध विमान सेवा कंपन्यांच्या समभागांमध्ये गुरुवारी मोठी हालचाल नोंदविली.

बँकांकडून अतिरिक्त अर्थसाहाय्य न मिळाल्याने उरलेली उड्डाणेही रद्द करावे लागलेल्या जेट एअरवेजच्या समभागाने गुरुवारच्या सत्रात त्याचा वर्षांतील मूल्यतळ अनुभवला. मंगळवारच्या तुलनेत तब्बल ३२.२३ अंशांनी आपटी घेणाऱ्या जेटचे समभागमूल्य गुरुवारच्या व्यवहारात १५८.१० रुपये असे वर्षभराच्या नीचांकाला जाऊन आले. दिवसअखेर तो १६३.९० वर स्थिरावला. दोन व्यवहारांतील सलग मूल्यघसरणीमुळे कंपनीचे भांडवल १,१११.१४ कोटींनी रोडावत १,८६१.८६ कोटींवर येऊन ठेपले.

जेट एअरवेजच्या घसरणीचा अप्रत्यक्ष लाभ मिळणाऱ्या स्पाइसजेटच्या समभागामध्ये गुरुवारी २.६८ टक्के वाढ होऊन मूल्य १३६.२५ रुपयांवर स्थिरावले. व्यवहारात त्याने १५ टक्के उसळीसह वार्षिक उच्चांक नोंदविला. १५२.६० रुपयांपर्यंत पोहोचल्यानंतर समभाग काही प्रमाणात खाली येतानाच मंगळवारच्या तुलनेत मात्र मूल्यवाढ नोंदविणारा ठरला.

स्पाइसजेने देशांतर्गत उड्डाणे वाढविण्यासह ताफ्यात त्वरित सहा मोठी विमाने दाखल करून घेण्याचे गुरुवारी जाहीर केले. कंपनी दोन आठवडय़ांत २७ विमाने दाखल करून घेणार आहे.

नफेखोरीने निर्देशांक घसरण

मुंबई : चालू आठवडय़ातील शेवटचे व्यवहार निर्देशांक घसरणीने होताना भांडवली बाजाराचे सेन्सेक्स व निफ्टी गुरुवारी त्यांच्या विक्रमी टप्प्यापासून माघारी फिरले. ऐतिहासिक टप्प्यावर असलेल्या दोन्ही निर्देशांकांमुळे गुंतवणूकदारांनी गुरुवारी नफेखोरी करत सेन्सेक्ससह निफ्टीला बुधवारच्या तुलनेत खाली आणले.

मुंबई निर्देशांक १३५.३६ अंश घसरणीसह ३९,१४०.२८ वर, तर ३४.३५ अंश घसरणीने ११,७५२.८० पर्यंत येऊन ठेपला. गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्स ३९,४८७.४५ तर निफ्टी ११,७५२.८० पर्यंत झेपावला होता. प्रमुख निर्देशांक मंगळवार व्यवहारअखेर विक्रमी टप्प्यावर बंद झाले होते.

यंदा सरासरीपेक्षा चांगला पाऊस होण्याच्या वेधशाळेच्या अंदाजावर भांडवली बाजार प्रथमच ऐतिहासिक टप्प्यावर विराजमान झाले होते. कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांवरही बाजारात गेल्या काही दिवसांपासून उत्साहवर्धक वातावरण होते.

चालू सप्ताहातील दोन दिवसांच्या सुटीमुळे बाजारात गुरुवारचे व्यवहार हे आठवडय़ातील शेवटचे व्यवहार ठरले. प्रमुख निर्देशांकांनी साप्ताहिक तुलनेत मात्र वाढ नोंदविली. या दरम्यान सेन्सेक्स ३७३.१७ अंशांनी तर निफ्टी १०९.३५ अंशांनी वाढला.

सेन्सेक्समध्ये येस बँक, वेदांता, इंडसइंड बँक, टाटा स्टील, लार्सन अँड टुब्रो, स्टेट बँक, एनटीपीसी, कोटक महिंद्र बँक, एचडीएफसी लिमिटेड, पॉवरग्रिड, इन्फोसिस, आयटीसी आदी ४ टक्क्यांपर्यंत घसरले. रिलायन्समध्ये जवळपास ३ टक्के वाढ नोंदली गेली.

टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, टीसीएस, कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प, अ‍ॅक्सिस बँक, हिंदुस्थान यूनिलिव्हर आदी २ टक्क्यांसह मुंबई निर्देशांकातील घसरणीच्या यादीत राहिले. ऊर्जा व तेल वायू वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकही खाली आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jet airways share fall after operation suspended