‘जेट’ची आंतरराष्ट्रीय उड्डाणे संस्थगित

स्टेट बँकेचे वर्चस्व आलेल्या जेट एअरवेजचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.

थकीत कर्जापोटी गेल्या अनेक महिन्यांपासून नियमित वेतन होत नसलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईत निदर्शने केली. ‘जेटसह आमचे भविष्यही सावरावे’ असे भावनिक आवाहन करणारे फलक यावेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दर्शविले.   (छायाचित्र : अमित चक्रवर्ती)

ताफ्यातील विमानांची संख्याही एकअंकी पातळीवर

मुंबई : आर्थिक समस्यांनी ग्रस्त जेट एअरवेजवर तिची आंतरराष्ट्रीय उड्डाणे पूर्णपणे संस्थगित करण्याची नामुष्की शुक्रवारी आली.

कंपनीची देशाबाहेरील उड्डाणे येत्या सोमवापर्यंत होऊ शकणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले. जेटच्या ताफ्यातील विमानांची संख्याही आता एक अंकी स्तरावर येऊन ठेपली आहे.

सुमारे ८,००० कोटी रुपयांचे कर्ज असलेल्या व स्टेट बँकेचे वर्चस्व आलेल्या जेट एअरवेजचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. एकेकाळी देशाच्या नागरी हवाई क्षेत्रात क्रमांक दोनची कंपनी असलेल्या जेट एअरवेजच्या ताफ्यातील विमानांची तसेच उड्डाणांची संख्या कमालीची रोडावली आहे. कंपनीतील हिस्सा विक्रीलाही अद्याप पुरेसा प्रतिसाद मिळालेला नाही.

गुरुवारी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणे कमी केल्यानंतर जेट एअरवेजची आंतरराष्ट्रीय उड्डाणे सोमवापर्यंत (१५ एप्रिल) होऊ शकणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कंपनीच्या ताफ्यातील विमानांची सध्याची ११ ही संख्या येत्या दोन दिवसात ६ ते ७ वर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कंपनी सध्या देशांतर्गत ५० उड्डाणे घेत आहे.

जेट एअरवेजच्या सध्याच्या बिकट स्थितीच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाने संबंधित विभाग व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलाविली आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनीही खात्याच्या सचिवांना एकूणच जेटच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्याचे आदेश दिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jet airways suspends international flights