scorecardresearch

विमान इंधन दरात १२ टक्क्यांची कपात

मुंबईमध्ये आता एटीएफचे दर किलोलिटरला १,२०,८७५.८६ रुपयांवर पोहोचले आहे. एटीएफ दरात पहिल्यांदाच एवढी मोठी कपात झाली आहे.

Jet fuel price
(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : मंदीच्या भीतीने आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर कमी झाल्याच्या परिणामी जेट इंधनाच्या (एटीएफ) किमतीत सोमवारी १२ टक्क्यांनी कपात करण्यात आली. गेल्या महिन्यात सार्वकालिक उच्चांकावर असणाऱ्या एटीएफच्या किमतीत कपात करण्यात आल्यानंतर विमानाचे इंधन म्हणून प्रचलित एव्हिएशन टर्बाइन फ्युएलमध्ये (एटीएफ) दर किलोलिटरमागे १६,२३२.३६ रुपयांनी म्हणजेच ११.७५ टक्क्यांनी सोमवारी कपात करण्यात आली. परिणामी, दिल्लीत त्याची किंमत आता किलोलिटरला १,२१,९१५.५७ रुपये झाली असल्याचे सरकारी तेल कंपन्यांनी स्पष्ट केले. मुंबईमध्ये आता एटीएफचे दर किलोलिटरला १,२०,८७५.८६ रुपयांवर पोहोचले आहे. एटीएफ दरात पहिल्यांदाच एवढी मोठी कपात झाली आहे. या आधी गेल्या महिन्यात १६ जुलैला दर किलोलिटरमागे ३,०८४.९४ म्हणजेच २.२ टक्क्यांची कपात करण्यात आली होती. सार्वकालिक उच्चांकावर असणाऱ्या एटीएफच्या किमतीतील कपातीमुळे विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भारतात आयात होणाऱ्या खनिज तेलासाठी मानदंड असलेल्या ब्रेंट क्रूडच्या सरासरी आंतरराष्ट्रीय किमतीच्या आधारावर प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला जेट इंधनाच्या किमतीचा आढावा घेतला जातो.

गेल्या महिन्यात १६ जुलै आणि १ ऑगस्टला एटीएफच्या दरांमध्ये कपात करण्याव्यतिरिक्त, १ जूनलादेखील १.३ टक्क्यांनी  किरकोळ कपात करण्यात आली होती. मात्र खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय दरात वाढ झाल्यामुळे चालू वर्षांत अकरा वेळा एटीएफच्या दरात वाढ करण्यात आली होती. १६ जूनला एटीएफच्या १६.२६ टक्क्यांनी वाढ झाल्याने ते किलोलिटरमागे १,४१,२३२.८७ या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले होते.

चालू वर्षांत ९१ टक्के वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दराने चालू वर्षांत १४० डॉलर प्रति पिंप पातळीला स्पर्श केला होता. १ जानेवारीपासून एटीएफच्या किमती ९१  टक्क्यांनी म्हणजेच ६७,२१०.४६ रुपये प्रतिकिलोने वाढल्या होत्या. विमान कंपनीच्या चालू खर्चाच्या जवळपास ४० टक्के खर्च इंधनावर होतो. ऑगस्ट २००८ मध्ये सर्वप्रथम एटीएफचे दर ७१,०२८.२६ रुपये प्रति किलोलिटर अशा सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-08-2022 at 03:48 IST

संबंधित बातम्या