मुंबई : रिलायन्स जिओच्या बहुप्रतीक्षित स्मार्टफोनचे गणेशोत्सवात नियोजित असलेले अनावरण पुढे ढकलण्यात आल्याचे भांडवली बाजारात सोमवारी नकारात्मक पडसाद उमटले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात दोन टक्क्यांची घसरण परिणामी दिसून आली.

जिओफोन नेक्स्ट १० सप्टेंबरला म्हणजे गणेशाच्या आगमनासह खरेदीसाठी उपलब्ध होईल, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जून महिन्यात कंपनीच्या भागधारकांच्या बैठकीत सांगितले होते. ‘मेड फॉर इंडिया’ असणाऱ्या या स्मार्टफोनची निर्मिती गूगल आणि जिओच्या भागीदारीतून करण्यात येत आहे. तथापि सध्या सेमीकंडक्टर चिपच्या कमतरतेमुळे स्मार्टफोनचे अनावरण पुढे ढकलले गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया म्हणून सोमवारी दिवसअखेर रिलायन्सचा समभाग २.२५ टक्क्यांनी घसरून २,३७०.८५ रुपयांवर बंद झाला.

एकूणच भांडवली बाजारात आठवड्याची सुरुवात निराशाजनक झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १२७.३१.अंशांच्या घसरणीसह ५८,१७७.७६ अंशांवर बंद झाला. तर निफ्टी १३.९५ अंश घसरणीसह १७,३५५.३०वर स्थिरावला. या निर्देशांकांत वजनदार स्थान असणाऱ्या समभागाच्या निराशाजनक कामगिरीमुळे सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद झाले.