मुंबई : केएफसी व पिझ्झाहट या खाद्यपदार्थ विक्रेत्या साखळी दालनांचे संचालन करणाऱ्या ‘सफायर फूड्स इंडिया’ची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या ९ नोव्हेंबरपासून खुली होत असून गुंतवणूकदारांना ११ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल. कंपनीने विक्रीसाठी प्रति समभाग १,१२० रुपये ते १,१८० रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे.

या भागविक्रीच्या माध्यमातून कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक त्यांचा भांडवली हिश्शाच्या आंशिक विक्रीच्या (ऑफर फॉर सेल) माध्यमातून १,७५,६९,९४१ समभाग विक्रीसाठी उपलब्ध करणार आहेत. यातून कंपनीचा २,०७३ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मानस आहे. विद्यमान भागधारकांपैकी क्यूएसआर मॅनेजमेंट ट्रस्ट ८.५० लाख समभाग, सफायर फूड मॉरिशस लिमिटेड ५५.६९ लाख समभाग, डब्ल्यूडब्ल्यूडी रुबी लि. ४८.५ लाख समभाग, अ‍ॅमेथिस्ट प्रा. लिमिटेड ३९.६ लाख समभाग, एएजेव्ही इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ८०,१६९ समभाग. तर एडेल्वाईस क्रॉसओव्हर अपॉच्र्युनिटीज फंड १६.२ लाख समभाग आणि एडेल्वाईस क्रॉसओव्हर अपॉच्र्युनिटीज फंड सीरिज २ – ६.४६ लाख समभागांची विक्री करणार आहे.

वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान १२ आणि त्यानंतरच्या १२ च्या पटीत समभागांसाठी बोली लावून, कंपनीच्या या भागविक्रीत सहभागी होता येईल. सफायर फूड्सद्वारे भारत आणि मालदीवमध्ये २०४ केएफसी रेस्टॉरंट तसेच भारत, श्रीलंका आणि मालदीवमध्ये मिळून २३१ पिझ्झाहट दालनांचे संचालन केले जाते. शिवाय श्रीलंकेत तिचे टॅको बेल नाममुद्रेखाली दोन रेस्टॉरंट अस्तित्वात आहेत.