नव्या पिढीचा बाजारमंच राहिलेल्या मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजमधील (एमसीएक्स) १५ टक्के हिस्साखरेदीची तयारी कोटक महिंद्र बँकेने दर्शविली आहे. एमसीएक्सची प्रमुख प्रवर्तक फायनान्शिअल टेक्नॉलॉजिजकडून (एफटीआयएल) कोटक महिंद्र बँक हा हिस्सा घेईल. हा व्यवहार ४५९ कोटी रुपयांचा असेल. एमसीएक्सच्या प्रति समभाग ६०० रुपये दराने ही प्रक्रिया पार पडेल. या माध्यमातून कोटक महिंद्र ही एमसीएक्समधील सर्वात मोठी भागीदार कंपनी ठरली आहे.
कोटक महिंद्र बँक ही खासगी क्षेत्रातील आघाडीची वाणिज्यिक बँक असून तिच्या समूह धोरणाचे प्रमुख पॉल पाराम्बी यांनी एमसीएक्समधील गुंतवणूक ही दीर्घकालीन असेल, असे स्पष्ट केले आहे. तर एफटीआयएलचे बिगर कार्यकारी अध्यक्ष व्यंकट चारी यांनी कोटक महिंद्र बँक एमसीएक्सची सर्वात मोठी भागीदार बनत असल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
सुमारे ५,६०० कोटी रुपयांच्या थकीत रकमेमुळे चर्चेत आलेल्या एनएसईएलचीदेखील प्रवर्तक कंपनी राहिलेल्या एफटीआयएलने एमसीएक्समधील ४ टक्के हिस्सा गेल्याच आठवडय़ात खुल्या बाजाराच्या माध्यमातून १५४ कोटी रुपयांना विकला होता. त्यामुळे कंपनीची मालकी २० टक्क्यांवर आली होती. कंपनीमध्ये समूहाचा हिस्सा सुरुवातीला २६ टक्के होता. जुलैच्या सुरुवातीलाच त्यातील ६ टक्के हिस्सा दोन टप्प्यांत एकूण २२० कोटी रुपयांना विकण्यात आला. एनएसईएल घोटाळ्यानंतर एफटीआयएल बाजार मंच चालविण्यास पात्र नसल्याचा वायदे बाजार आयोगाचा ठपका पडल्यानंतर समूहाने एमसीएक्समधील हिस्सा कमी करण्याचे ठरविले. याबाबत समूहाला २ टक्क्यांवर हिस्सा आणण्यास सांगितले गेले होते. समूहाचा आता एमसीएक्समध्ये ५ टक्के हिस्सा असून आणखी ३ टक्के हिस्सा विक्री करणे आवश्यक आहे. एमसीएक्सच्या पुनर्रचनेसाठी समूहाने यापूर्वीच समिती नेमली असून जेएम फायनान्शिअलला गुंतवणूक बँक व आकॅनला सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. २००३ मध्ये अस्तित्वात आलेला एमसीएक्स हा सूचिबद्ध होणारा पहिला बाजारमंच आहे.

एमसीएक्स – कोटक वधारले
कोटक व एमसीएक्स यांमध्ये सुटीच्या दिवशी झालेल्या हिस्सा व्यवहारानंतर भांडवली बाजारात एमसीएक्सचा समभाग तब्बल १४ टक्क्यांपर्यंत उंचावला. ८९५ रुपये या गेल्या वर्षभरातील उच्चांकावर तो पोहोचला होता. उलट एफटीआयएलचा समभाग ७.७६ टक्क्यांनी घसरत २८८.१० रुपयांवर आला. तर कोटक महिंद्र बँक समभागाचे मूल्यदेखील ३.१९ टक्क्यांनी वधारत ९६५ रुपयांवर गेले.