पीटीआय, नवी दिल्ली
गेल्या महिन्यात भांडवली बाजारात पदार्पण केलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अर्थात एलआयसीच्या समभाग मूल्यात निरंतर सुरू असलेल्या घसरणीबद्दल शुक्रवारी केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे.एलआयसीच्या समभागात सुरू असलेल्या घसरणीबाबत सरकार खूप चिंतित आहे. गुंतवणूकदारांना एलआयसीचे खरे मूल्य समजण्यास वेळ लागेल. एलआयसी व्यवस्थापनही बाजारातील समभागांच्या घसरणीकडे लक्ष ठेवून आहे. ते भागधारकांचे मूल्य वाढवण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग अर्थात ‘दीपम’ विभागाचे सचिव तुहीन कांता पांडे यांनी व्यक्त केला.

गेल्या महिन्यात मोठय़ा गाजावाजासह प्रारंभिक भागविक्रीनंतर, यशस्वी गुंतवणूकदारांनी प्रत्येकी ९४९ रुपये किमतीला (सुटीचा अपवाद करता) एलआयसीचा समभाग मिळविला. प्रत्यक्षात १७ मेला त्यापेक्षा खाली किमतीला एलआयसीच्या समभागाने ८७२ रुपयांवर भांडवली बाजारात पदार्पण केले. त्यानंतर समभागात निरंतर घसरण सुरूच आहे. मागील सलग नऊ सत्रात एलआयसीच्या समभागात घसरण सुरू असून, सूचिबद्धतेपश्चात २५ टक्क्यांहून अधिक मूल्य त्याने गमावले आहे.

सुकाणू गुंतवणूकदारांनी पाठ केल्यास?
सुकाणू (अँकर) गुंतवणूकदारांसाठी असलेला समभाग धारणेचा (लॉक इन) कालावधी पुढील आठवडय़ात (१६ जूनला) संपत आहे. या बडय़ा गुंतवणूकदारांनी एलआयसीकडे पाठ केल्यास, समभाग विक्री आणखी तीव्र रूप धारण करू शकेल. अशीच शक्यता गृहीत धरत म्हणजेच अधिक घसरण होण्याच्या भीतीने गुंतवणूकदार आधीच समभाग विक्री करत आहेत. एलआयसीच्या समभागाने शुक्रवारच्या सत्रात ७०८.०५ या ऐतिहासिक नीचांकी पातळीला स्पर्श केला. दिवसअखेर एलआयसीचा समभाग १.६६ टक्क्यांच्या घसरणीसह ७०९.७० रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला.

दहा दिवसात १०६ रुपयांची घसरण
एलआयसीचा समभाग १ जून रोजी ८१५ रुपयांवर व्यवहार करत होता. तो शुक्रवारी १.६६ टक्क्यांच्या घसरणीसह ७०९.७० रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. म्हणजेच दहा सत्रात एलआयसीच्या समभागात सुमारे १०६ रुपयांची घसरण झाली आहे. समभागाच्या बाजाभावानुसार कंपनीचे बाजारभांडवल ४,४८,८८५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.