निर्गुतवणुकीचेलक्ष्यानुरूप नियोजन ; ‘एलआयसी’ची भांडवली बाजाराला धडक चालू आर्थिक वर्षांतच!

भांडवली बाजाराला आजमावण्याचा हा प्रसंग २०२२ सालासाठीच नव्हे तर इतिहासातील स्मरणीय घटना असेल,

नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) प्रारंभिक समभाग विक्री नववर्षांत जानेवारी-मार्च दरम्यान म्हणजे विद्यमान आर्थिक वर्षांतच होणे अपेक्षित आहे. सर्वात मोठय़ा भारतीय गुंतवणूकदार संस्थेनेच भांडवली बाजाराला आजमावण्याचा हा प्रसंग २०२२ सालासाठीच नव्हे तर इतिहासातील स्मरणीय घटना असेल, असे प्रतिपादन गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग अर्थात ‘दीपम’चे सचिव तुहिन कांता पांडे यांनी बुधवारी केले.

निर्गंतवणुकीच्या माध्यमातून २०२१-२२ मध्ये १.७५ लाख कोटी रुपयांच्या महसुलाच्या उभारणीचे अर्थसंकल्पीय लक्ष्य गाठावयाचे झाल्यास, एलआयसीमधील सरकारच्या मालकीचा काही हिस्सा खुल्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून विकला जाणे नितांत गरजेचा आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. तूर्त तरी हे लक्ष्य गाठले जाण्याच्या दिशेने सरकारचे नियोजन दिसत आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या आघातामुळे काही काळासाठी रखडलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या खासगीकरणाची प्रक्रिया आता पुन्हा रुळावर आली आहे आणि येत्या वर्षांत जानेवारीपर्यंत ही उत्सुक गुंतवणूकदारांकडून निविदा मागविण्यात येतील.

जानेवारी ते मार्च २०२२ या अखेरच्या तिमाहीत भारत पेट्रोलियम, बीईएमएल आणि शिपिंग कॉर्पोरेशनसह सहा सार्वजनिक उपक्रमांच्या खासगीकरणाची इरादापत्रे मागविण्यात येतील, असे सरकारचे नियोजन आहे.

सार्वजनिक उपक्रमातील कंपन्यांच्या हिस्सेदारी खरेदीसाठी उत्सुक असलेल्या खासगी क्षेत्रातील कंपन्यांना बोली लावण्याचे आवाहन करत तुहिन कांता पांडे म्हणाले की, सुमारे १९ वर्षांनंतर चालू वर्षांत पाच ते सहा कंपन्यांचे खासगीकरण होणार आहे. बीईएमएल, शिपिंग कॉर्पोरेशन, पवन हंस, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स, नीलाचल इस्पात या सार्वजनिक उपक्रमांच्या खासगीकरणासाठी डिसेंबर ते जानेवारी दरम्यान निविदा मागविल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

विद्यमान २०२१-२२ आर्थिक वर्षांत, केंद्र सरकारने स्पेसिफाइड अंडरटेकिंग ऑफ द युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया अर्थात ‘सूटी’मार्फत अ‍ॅक्सिस बँकेतील सरकारचा भांडवली हिस्सा विकून ९,३३० कोटी रुपयांचा निधी उभारला आहे.

एअर इंडियाचा अनुभव महत्त्वाचा

एअर इंडियाच्या मालकीचे टाटा समूहाकडे हस्तांतरणाची प्रक्रिया डिसेंबपर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. एअर इंडियाच्या खासगीकरणाचा अनुभव इतर सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण वेगाने करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे, असा विश्वास पांडे यांनी व्यक्त केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lic ipo expected to hit capital market in current financial year zws

ताज्या बातम्या