LIC IPO Price, Subscription Status > बहुप्रतीक्षित भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या प्रारंभिक समभाग विक्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. एलआयसीचा आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध झाल्यानंतर गुंतवणूकदार त्यावर तुटून पडलेत असं चित्र दिसत आहे. पहिल्या दहा मिनिटांमध्ये १७ लाख शेअर्ससाठी बोली लावण्यात आलीय. सुकाणू गुंतवणूकदारांनीही सोमवारी या आयपीओला उत्तम प्रतिसाद दिल्यानंतर आज या शेअर्ससाठी गुंतवणुकदारांमध्ये चढाओढ दिसून येत आहे.

एलआयसीच्या आयपीओसाठी बिडिंग सुरु झाल्यानंतर पहिल्या दहा मिनिटांमध्ये १६ लाख ६६ हजार ४७० शेअर्ससाठी गुंतवणूकदारांनी बोली लावली. ही बोली रिटेल आणि कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या शेअर्साठी लावण्यात आलीय. या आयपीओच्या माध्यमातून १६ हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे शेअर्स सरकारने विक्रीसाठी काढले आङेत. एचएनआय आणि क्यूआयबी कॅटेगरीच्या गुंतवणूकदारांनी अद्याप बोली लावलेली नाही. आयपीओच्या आधी कंपनच्या अनलिस्टेड शेअर्स ग्रे मार्केटमध्ये प्रमियम ५० ते ५५ रुपये सुरु आहे. आधी हा दर ८५ ते ९० रुपयांदरम्यान होता.

एलआयसीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिलाय. देशातील आतापर्यंताचा सर्वात मोठा आयपीओ सकाळी दहा वाजता सबक्रीप्शनसाठी खुला करण्यात आला. पहिल्या चार तासांमध्येही चार टक्के सबस्क्रीप्शन झालं. यामध्ये १६ कोटी २० लाख ७८ हजार ६७ शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेत. त्यापैकी ७० लाख ६१ हजार ९७० शेअर्ससाठी बोली लावण्यात आलीय. कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेला भाग हा १० टक्के, रिटेल पोर्शन आठ टक्के आणि एचएनआय पोर्शन दोन टक्के सबस्क्राइब झालाय.

केंद्र सरकारने त्यांच्या मूळ योजनेप्रमाणे पाच टक्क्यांऐवजी फक्त ३.५ टक्के भांडवली हिस्सा विकून या ‘आयपीओ’मधून २१,००० कोटींचा निधी उभारू पाहत आहे. सरकारच्या हिस्सा विक्रीत कपात झाली असली तरी देशाच्या भांडवली बाजारातील ही आजवरची सर्वात मोठी सार्वजनिक भागविक्री ठरणार आहे. कंपनीने भागविक्रीसाठी प्रतिसमभाग ९०२ रुपये ते ९४९ रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना बुधवारपासून (४ मे) पुढील सोमवार ९ मेपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे.

बाजारमंचांकडून उपलब्ध माहितीनुसार, सुकाणू गुंतवणूकदारांनी एलआयसीसाठी निश्चित करण्यात आलेल्या ९०४ रुपये ते ९४९ रुपये या किंमतपट्टय़ातील कमाल पातळीला बोली लावत ५.९२ कोटी समभागांसाठी बोली लावली आहे. देशांतर्गत सुकाणू गुंतवणूकदारांकडून या प्रक्रियेला भरभरून प्रतिसाद मिळाला असून आघाडीच्या १५ म्युच्युअल फंड घराण्यांनी ७१.९२ टक्के म्हणजेच सुमारे ४.२ कोटी समभागांसाठी बोली लावली आहे. एलआयसीच्या ‘आयपीओ’मध्ये विदेशातून गुंतवणूकदारांच्या सहभागाबाबत एकंदर साशंकता होतीच, त्याप्रमाणे सुकाणू गुंतवणूकदारांमध्ये जवळपास ८० टक्के भरणा हा देशी गुंतवणूकदार संस्थांकडून झाला आहे.

देशांतर्गत विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांनी देखील गुंतवणूक केली आहे. या श्रेणीतील काही प्रमुख नावांमध्ये आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, कोटक मिहद्र लाइफ इन्शुरन्स,पीएनबी मेटालाइफ इन्शुरन्स, एसबीआय पेन्शन फंड आणि यूटीआय रिटायरमेंट सोल्युशन्स पेन्शन फंड योजना यांचा समावेश आहे. तर परदेशी सुकाणू गुंतवणूकदारांमध्ये सिंगापूर सरकार, सिंगापूर चलन प्राधिकरण, गव्हर्नमेंट पेन्शन फंड ग्लोबल आणि बीएनपी इन्व्हेस्टमेंट एलएलपी यांचा समावेश आहे.