मुंबई : इतिहासातील सर्वात मोठय़ा समभाग विक्रीच्या सफलतेनंतर भांडवली बाजारात सूचिबद्ध झालेल्या, भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीला आघाडीच्या दहा कंपन्यांमधील स्थान मात्र कायम राखता आलेले नाही. एलआयसीची जागा आता बजाज फायनान्स आणि अदानी ट्रान्समिशनने घेतली आहे.

चालू वर्षांत १७ मे रोजी भांडवली बाजारात सूचिबद्ध झालेल्या एलआयसीच्या समभागाला घसरणीचे ग्रहण लागले आहे. प्रारंभिक भागविक्रीपश्चात प्रति समभाग ९४९ रुपये किमतीला हा समभाग गुंतवणूकदारांनी मिळविला. मात्र जशी अपेक्षा केली जात होती त्याप्रमाणे एलआयसीच्या समभागाचे मूल्य वाढण्याऐवजी निरंतर घरंगळत असल्याने गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे. मंगळवारच्या सत्रात एलआयसीचा समभाग ६५० या नीचांकी पातळीजवळ, ६७४.५५ रुपयांवर होता. ४१ लाख कोटींपेक्षा जास्त मालमत्तेचे व्यवस्थापन करणाऱ्या  देशातील सर्वात मोठय़ा विमा कंपनीचे  बाजारभांडवल ४,२६,७१५ कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. परिणामी आघाडीच्या दहा कंपन्यांतील स्थान गमावत ती अकराव्या क्रमांकावर घसरली आहे.