पीटीआय, नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या प्रारंभिक समभाग विक्रीला सुकाणू गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मुख्यत: देशांतर्गत गुंतवणूकदारांनी सोमवारी झालेल्या समभाग विक्रीत बोली लावून, सुकाणू गुंतवणूकदारांसाठी राखीव हिश्शातून ५,६२७ कोटी रुपये उभारण्यास योगदान दिले आहे. यापैकी सुमारे ४,००० कोटींचे योगदान हे देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून आले आहे.
केंद्र सरकारने त्यांच्या मूळ योजनेप्रमाणे पाच टक्क्यांऐवजी फक्त ३.५ टक्के भांडवली हिस्सा विकून या ‘आयपीओ’मधून २१,००० कोटींचा निधी उभारू पाहत आहे. सरकारच्या हिस्सा विक्रीत कपात झाली असली तरी देशाच्या भांडवली बाजारातील ही आजवरची सर्वात मोठी सार्वजनिक भागविक्री ठरणार आहे. कंपनीने भागविक्रीसाठी प्रतिसमभाग ९०२ रुपये ते ९४९ रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना बुधवारपासून (४ मे) पुढील सोमवार ९ मेपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे.
बाजारमंचांकडून उपलब्ध माहितीनुसार, सुकाणू गुंतवणूकदारांनी एलआयसीसाठी निश्चित करण्यात आलेल्या ९०४ रुपये ते ९४९ रुपये या किंमतपट्टय़ातील कमाल पातळीला बोली लावत ५.९२ कोटी समभागांसाठी बोली लावली आहे. देशांतर्गत सुकाणू गुंतवणूकदारांकडून या प्रक्रियेला भरभरून प्रतिसाद मिळाला असून आघाडीच्या १५ म्युच्युअल फंड घराण्यांनी ७१.९२ टक्के म्हणजेच सुमारे ४.२ कोटी समभागांसाठी बोली लावली आहे. एलआयसीच्या ‘आयपीओ’मध्ये विदेशातून गुंतवणूकदारांच्या सहभागाबाबत एकंदर साशंकता होतीच, त्याप्रमाणे सुकाणू गुंतवणूकदारांमध्ये जवळपास ८० टक्के भरणा हा देशी गुंतवणूकदार संस्थांकडून झाला आहे.
देशांतर्गत विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांनी देखील गुंतवणूक केली आहे. या श्रेणीतील काही प्रमुख नावांमध्ये आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, कोटक मिहद्र लाइफ इन्शुरन्स,पीएनबी मेटालाइफ इन्शुरन्स, एसबीआय पेन्शन फंड आणि यूटीआय रिटायरमेंट सोल्युशन्स पेन्शन फंड योजना यांचा समावेश आहे. तर परदेशी सुकाणू गुंतवणूकदारांमध्ये सिंगापूर सरकार, सिंगापूर चलन प्राधिकरण, गव्हर्नमेंट पेन्शन फंड ग्लोबल आणि बीएनपी इन्व्हेस्टमेंट एलएलपी यांचा समावेश आहे.