मुंबई : बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) समभागावर भांडवली बाजारातील पडझडीचा आणि अस्थिर वातावरणाच्या नकारात्मक परिणामाची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. देशाच्या भांडवली बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा ‘आयपीओ’नंतर, एलआयसीच्या समभागांचे येत्या १७ मेला बाजारातील पदार्पण हे ९५० ते ९७० रुपयांदरम्यान म्हणजेच जेमतेम वाढीने होण्याचे कयास केले जात आहेत.

प्रति समभाग ९०२ रुपये ते ९४९ रुपये या किमतीला झालेल्या एलआयसीच्या प्रारंभिक समभाग विक्रीला पॉलिसीधारक आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी दिलेल्या प्रतिसादामुळे सोमवारी अंतिम दिवशी मुदत संपली तेव्हा २.९५ पट अधिक भरणा करणारा प्रतिसाद मिळाला होता. तर एलआयसीचे पॉलिसीधारक आणि किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांना या भागखरेदीवर प्रति समभाग अनुक्रमे ६० रुपये आणि ४५ रुपये सूट मिळविता येणार आहे. 

सध्या जगभरातील देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून महागाई नियंत्रणासाठी आक्रमकपणे पावले उचलली जात असून मोठय़ा प्रमाणावर व्याजदर वाढ केली जात आहे. शिवाय रिझव्‍‌र्ह बॅंकेने गेल्या आठवडय़ात नियोजित बैठकीच्या आधीच रेपो दरात थेट ०.४० टक्क्यांची वाढ केली आणि त्यापाठोपाठ फेडरल रिझव्‍‌र्हकडून देखील व्याजदरात अर्ध्या टक्क्यांची वाढ करण्यात आली. यामुळे बाजारात मोठय़ा प्रमाणावर पडझड झाली. शिवाय परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा सुरू झाल्याने भांडवली बाजारात दोलायमान परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर एलआयसीच्या समभागाचे मूल्य वाजवी आणि रास्त असून देखील बाजारातील अस्थिर वातावरण, अपेक्षेहून कमी मिळालेला प्रतिसाद आणि एलआयसीच्या ‘आयपीओ’चे मोठे आकारमान या घटकांमुळे सूचिबद्धतेला समभागात घसरण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

यशस्वी बोलीदारांना आज समभागांचे वाटप 

एलआयसी आयपीओमधील यशस्वी बोलीदारांना गुरुवारी, १२ मे रोजी समभागांचे वाटप केले जाणार आहे. तर या महाकाय विमा कंपनीचे समभाग, मंगळवार, १७ मे रोजी शेअर बाजारात सूचिबद्ध केले जातील.