लिनन प्रकारचे कापड असलेली पुरुषांसाठीची तयार वस्त्रप्रावरणांची दालनांची शृंखला अन्य राज्यांतही विस्तारण्याचे ‘लिननकिंग’ने जाहीर केले आहे. ‘लिननकिंग’च्या ठाण्यातील दालनाचे उद्घाटन मंगळवारी सदिच्छादूत व अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते झाले.

पुरुषांसाठीच्या तयार सुती वस्त्रप्रावरण क्षेत्रातील आघाडीच्या कॉटनकिंग समूहाने ‘लिननकिंग’ ही नाममुद्रा विकसित केली आहे. लिनन प्रकारचे वस्त्र पुरुषांसाठीचे शर्ट, कुर्ता, जॅकेट आदी या नाममुद्रेंतर्गत प्रथमच स्वतंत्ररीत्या सादर करण्यात आले आहे. कंपनी ब्रिटनमधून लिनन प्रकारचे कापड आयात करते. लिनन प्रकारचे पुरुषांसाठी तयार वस्त्र कंपनीने तीन वर्षांपूर्वीच आणले होते. सध्या ११ दालने व २५ कोटींची उलाढाल असलेल्या ‘लिननकिंग’चे वर्षभरात २५ दालने आणि १०० कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट राखले आहे.

लिननकिंग दालनांचा विस्तार महाराष्ट्राबरोबरच देशातील प्रमुख शहरांमध्ये करण्यात येईल, असे लिननकिंगचे संचालक कुणाल मराठे यांनी या वेळी सांगितले. याअंतर्गत कंपनीची सांगली व सोलापूर येथील दालने गुरुवारच्या दसऱ्याला सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली.