छोटय़ा व्यवसायांसाठी, छोटे कर्ज पाठबळ

लघू व सूक्ष्म व्यवसाय-उद्योगांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या मुद्रा योजनेतून चालू आर्थिक वर्षांत १.२२ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले जाईल, असे उद्दिष्ट राखण्यात आले असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.
आजवर मुद्रा योजनेतून सुमारे ३७ लाख छोटय़ा उद्योजकांना जवळपास २४ हजार कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे, असे जेटली यांनी येथे पंजाब नॅशनल बँकेद्वारे आयोजित कर्जमेळाव्यात बोलताना सांगितले. मार्च २०१६ पर्यंत १.२२ लाख कोटी रु. छोटे उद्योग, व्यापारी, व्यावसायिकांना बँकांमार्फत वितरित केले जातील, असे आपण लक्ष्य ठेवले आहे. यातून छोटय़ा-मोठय़ा व्यवसायांची घडी बसविली जाऊन, ते स्वत:सह आणखी काही लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करतील, अशी अपेक्षा असल्याचे जेटली यांनी सांगितले. पहिल्या वर्षी सव्वा ते पावणेदोन कोटी लघुव्यावसायिक मुद्रा योजनेचे लाभार्थी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मुद्रा योजना काय?
कोणत्याही तारण अथवा जामिनाविना बँकांकडून छोटय़ा-मोठय़ा व्यवसाय-उद्योगांना प्राधान्याने १० लाखांपर्यंत कर्जसाहाय्य देणारी योजना
कर्जाचे तीन प्रकार
शिशू (५०,००० रुपयांपर्यंत)
किशोर (५० हजार रु. ते ५ लाखांपर्यंत)
तरुण (५ लाख रु. ते १० लाख रु.)
कर्ज रकमेचा वापर कसा केला जातो याचा बँकांचे अधिकारी नियमित आढावा घेतील.
बँक अधिकाऱ्यांच्या सकारात्मक अहवालानंतर, लाभार्थ्यांना अतिरिक्त कर्जसाहाय्यही दिले जाईल.
लाभार्थी कोण?
छोटे-मोठे विक्रेते, दुकानदार, फेरीवाले, कारागीर, न्हावी, गटई कामगार, स्वयंरोजगार करणारे, सूक्ष्म उद्योजक, कुटिरोद्योग व तत्सम तात्पुरती लागणारी बीज भांडवलाची रक्कम सावकारांकडून कर्ज घेऊ भागविणारे उद्यमी.