बँकांकडून ६३,५७४ कोटींचे कर्ज वितरण

विशेष कार्यक्रमांतर्गत वितरित कर्जे ही केंद्र सरकारने करोनाकाळात प्रोत्साहनपर सुरू केलेल्या विविध कर्ज हमी योजनांअंतर्गत मंजूर आणि वितरित केलेल्या कर्जाच्या व्यतिरिक्त आहेत.

पंधरवड्यातील विशेष मोहिमेचे १३.८४ लाख लाभार्थी

अर्थव्यवस्थेत दिसत असलेल्या सुधाराप्रमाणे देशातील बँकांनी पतपुरवठा वाढवावा या उद्देशाने सरलेल्या ऑक्टोबरमध्ये १५ दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेचे इच्छित परिणाम दिसून आले. या कार्यक्रमांतर्गत पंधरवड्यात १३.८४ लाख कर्जदारांना ६३,५७४ कोटी रुपयांची कर्जे मंजूर केली, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दिली.

बँकांनी हाती घेतलेल्या कार्यक्रमांतर्गत देशातील विविध भागांमध्ये पात्र कर्जदारांना कर्ज मंजूर करण्यासाठी विशेष मेळावे- शिबिरांचे आयोजन करण्यात आले. बहुतांश बँकांनी सणोत्सवाच्या काळात सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून दिले. शिवाय कर्जमंजुरीसाठी प्रक्रिया शुल्कही माफ केले. गेल्या महिन्यात १६ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेंतर्गत ३१ ऑक्टोबरपर्यंत देशभरात आयोजित १०,५८० शिबिरांमधून एकूण ६३,५७४ कोटी रुपयांची कर्जे मंजूर करण्यात आली, असे अर्थ मंत्रालयाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

या विशेष कार्यक्रमांतर्गत वितरित कर्जे ही केंद्र सरकारने करोनाकाळात प्रोत्साहनपर सुरू केलेल्या विविध कर्ज हमी योजनांअंतर्गत मंजूर आणि वितरित केलेल्या कर्जाच्या व्यतिरिक्त आहेत. अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सुमारे ३.२ लाख लाभार्थ्यांना २१,६८७.२३ कोटी रुपयांची व्यावसायिक कर्जे मंजूर करण्यात आली, तर ५९,०९० कर्जदारांना ४,५६०.३९ कोटी रुपयांची वाहन कर्जे मंजूर करण्यात आली. याशिवाय ४१,२२६ कर्जदारांना ८,९९४.२५ कोटी रुपयांची गृह कर्जे मंजूर करण्यात आली आहेत. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना या विशेष पंधरवड्यात १६,७३४.६२ कोटी रुपयांचे कृषी कर्जे देण्यात आली. याचा सात लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी फायदा घेतला. बँकांद्वारे ऑक्टोबर २०१९ आणि मार्च २०२१ दरम्यान देशातील विविध भागात कर्ज वितरण कार्यक्रम, कर्ज मेळावे आयोजित करण्यात आले होते आणि आरएएम अर्थात किरकोळ, कृषी आणि सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी सर्व प्रकारच्या निधीची आवश्यकता पूर्ण करण्यात आल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loans of rs 63574 crore from banks akp

Next Story
‘कन्साइ नेरॉलॅक’ला सणांच्या हंगामात मागणीतील दुप्पट वाढ अपेक्षित
ताज्या बातम्या