वृत्तसंस्था, मुंबई : नऊ दशकांचा वारसा असलेली नामांकित सौंदर्यप्रसाधन नाममुद्रा रेव्हलॉन संपादित करण्याच्या दिशेने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची पावले वळली आहेत. या अमेरिकी कंपनीच्या प्रवर्तकांनी दिवाळखोरीसाठी अर्ज सादर केला असून, मुकेश अंबानीप्रणीत कंपनीला नव्या पिढीला साजेशा आणखी एका व्यवसाय क्षेत्रात प्रवेशाची ही संधी खुणावत आहे.

जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि त्यापायी विक्रेत्यांनी देणी आगाऊ भागवण्याची मागणी सुरू केल्यानंतर, कर्जाचा डोंगर वाढत चाललेल्या रेव्हलॉन इन्कने चालू आठवडय़ाच्या सुरुवातीला दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला. या आधी करोना साथीच्या मोठय़ा त्रासदायक कालावधीत कंपनीने तग धरला. ग्राहकांच्या बदललेल्या आवडीनिवडी आणि नवीन नाममुद्रांनी रेव्हलॉनचा बाजारहिस्सा गिळंकृत केल्याने विक्री उत्तरोत्तर घटत गेल्याचे कंपनी अनुभवत आली आहे.

दुसरीकडे रिलायन्सने अलीकडच्या काही वर्षांत, तेल या मुख्य व्यवसायाबाहेर अनेक नवनव्या व्यवसाय क्षेत्रात हिरिरीने विस्तार सुरू राखला आहे. दूरसंचार, डिजिटल आणि किराणा क्षेत्रात तिने दमदार पायही रोवले आहेत. फॅशन आणि वैयक्तिक निगा या क्षेत्रातही तिने प्रवेश केला असून खेळणी, डिझायनर परिधाने या पाठोपाठ आता रेव्हलॉनमार्फत सौंदर्यप्रसाधनांचे क्षेत्रही ती आजमावू पाहात आहे. रिलायन्स व रेव्हलॉन दोहोंपैकी कोणीही या व्यवहारविषयक घडामोडींना अधिकृतपणे दुजोरा दिलेला नसल्याचेही वृत्तसंस्थेने स्पष्ट केले आहे.