कोटय़वधींच्या व्यवहाराच्या पूर्ततेत असमर्थतेबद्दल सदस्य ब्रोकर्सवर दोषारोप ठेवीत, अशा थकबाकीदारांची नावे जाहीर करण्याचा ‘एनएसईएल’चा प्रयत्न चांगलाच अंगलट आला आहे. उलट बाजार मंचाकडूनच येणी बाकी असल्याचा दावा ‘लोटस रिफायनरीज’ या थकबाकीदारांच्या सूचीतील एका सदस्य कंपनीकडून केला गेला आहे. प्रसंगी रक्कम वसुलीसाठी तसेच प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी ‘एनएसईएल’विरोधात कायदेशीर लढाईचा पवित्रा तिने घेतला आहे.
तब्बल ५,६०० कोटी रुपयांच्या सौद्यांच्या पूर्ततेत अपयशाबद्दल वायदे बाजार नियंत्रक ‘एफएमसी’च्या कारवाईनंतर सर्व व्यवहार ठप्प पडलेल्या एनएसईएल या बाजार मंचाने व्यवहारात सहभागी होऊनही रक्कम येणे असलेल्या काही सदस्यांची यादी अलीकडेच जाहीर केली. या देणीदारांमध्ये लोटस रिफायनरीजचेही नाव आले. एनएसईएलकडूनच आपल्याला येणे असूनही आता बाजारमंचाने उलट आपल्याकडे तगादा लावणे चुकीचे असल्याचे लोटसने म्हटले आहे. तूर्त याबाबत केवळ लोटसनेच पुढाकार घेतला असला तरी असे अनेक ‘चुकीचे’ थकबाकीदार बाजार मंचाविरुद्ध एकवटण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
याबाबत कंपनीवर एनएसईएलचे देणे थकीत करण्याबाबतचा दावा अवैध आणि निराधार आहे, असे लोटसचे म्हणणे आहे. एनएसईएलच्याच नियम ४१ प्रमाणे हे गैर असल्याचा दावा लोटसचा आहे. या प्रकरणी लोटसने देणीदारांच्या यादीतून नाव काढण्यासाठी कायदेशीर नोटीस एनएसईएलला बजाविली आहे. एनएसईएलबरोबर २६५ कोटी रुपयांचा व्यवहार असलेल्या लोटसने आपण ७.५ लाख मुदत ठेवीच्या रुपात जमा केल्याचे म्हटले आहे. एनएसईएलच्या गोदामांमध्ये ६ ऑगस्टपर्यंत कंपनीच्या ४४,५८६ टन शुद्ध पाम तेलाचा साठा असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
बाजार मंचाने २२ ऑगस्टला नावे जाहीर केल्यावर २९ ऑगस्टला लोटसकडून नोटीस पाठविण्यात आली. बदनामीने व्यवसाय करण्यात अडचण येत असल्याचे कंपनीच्या जनसंपर्क सरव्यवस्थापक वीरेन ठक्कर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. लोटस रिफायनरीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अरुण शर्मा यांनी नेमकी किती रक्कम बाजार मंचाकडून येणे आहे, हे दोन दिवसात समोर आणेल असे सांगितले.