scorecardresearch

प्रमुख क्षेत्रांची वाढ खुंटली!; ऑगस्टमध्ये वाढीचा दर ३.३ टक्क्यांवर

अर्थव्यवस्थेचा गाभा व्यापणाऱ्या आठ प्रमुख क्षेत्रांच्या विकासदरात ऑगस्टमध्ये घट नोंदविण्यात आल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट केले.

प्रमुख क्षेत्रांची वाढ खुंटली!; ऑगस्टमध्ये वाढीचा दर ३.३ टक्क्यांवर
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

पीटीआय, नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेचा गाभा व्यापणाऱ्या आठ प्रमुख क्षेत्रांच्या विकासदरात ऑगस्टमध्ये घट नोंदविण्यात आल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. जागतिक पातळीवरील रशिया-युक्रेन युद्ध आणि त्या परिणामी पुरवठय़ाच्या बाजूने निर्माण झालेल्या अडचणी आणि मागणीत झालेली घट यामुळे प्रमुख पायाभूत क्षेत्रांची गती मंदावली.

ऑगस्ट महिन्यात एकूण प्रमुख क्षेत्रांचा विकासदर ९ महिन्यांच्या नीचांकी पातळीसह ३.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. जो त्या आधीच्या जुलै महिन्यात ४.५ टक्के नोंदवला गेला होता. तर गेल्या वर्षी याच महिन्यात तो १२.२ टक्के नोंदवण्यात आला होता. प्रमुख आठ पायाभूत क्षेत्रांपैकी सहा क्षेत्रांनी सरलेल्या ऑगस्ट महिन्यात वाढ दर्शविली. या सहा क्षेत्रांमध्ये कोळसा, तेल शुद्धीकरणावर आधारित उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट व वीज निर्मिती यांचा समावेश आहे.

जगभरात मंदीचे वारे वाहत असले तरीही भारतीय अर्थव्यवस्था वेगवान मार्गक्रमण करत आहे. मात्र अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हसह जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवून महागाई कमी करण्याला दिलेला प्राधान्यक्रम आणि दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेला भू-राजकीय संकटामुळे जगातील प्रमुख राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेसह भारतीय अर्थव्यवस्थेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोळसा क्षेत्रातील उत्पादनांत वार्षिक आधारावर ७.६ टक्के वाढ नोंदवण्यात आली. तर वीजनिर्मिती क्षेत्राने ०.९ टक्के वाढ साधली. तेल शुद्धीकरणावर आधारित उत्पादने ७ टक्के, सिमेंट आणि पोलाद उत्पादनात अनुक्रमे १.८ टक्के आणि २.२ टक्के वाढ झाली. तर खते उत्पादनात सर्वाधिक ११.९ टक्क्यांची वाढ झाली. या उलट खनिज तेल उत्पादन ३.३ टक्क्यांनी आणि नैसर्गिक वायू उत्पादन ०.९ टक्क्यांनी घसरले.

एप्रिल ते ऑगस्टदरम्यान आठ प्रमुख क्षेत्रांचा विकासदर गेल्या आर्थिक वर्षांच्या याच कालावधीशी तुलना करता ९.८ टक्के राहिला आहे. करोनाच्या सावटातून देशांतर्गत आघाडीवर अर्थव्यवस्था सावरली असली तरीही गेल्या काही महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे चढे दर आणि वस्तू-सेवा महागल्याने एकूणच महागाईचा भडका उडाल्याने रिझव्‍‌र्ह बँकेकडून वर्षभरात चार वेळा व्याजदर वाढ करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या