scorecardresearch

‘महाबँके’चा तिमाही नफा दुपटीने वाढून ३५५ कोटींवर

पुण्यात मुख्यालय असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या (महाबँक) निव्वळ नफ्यात मार्चअखेर तिमाहीत गेल्या वर्षांतील याच तिमाहीतील नफ्याच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे.

मुंबई : पुण्यात मुख्यालय असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या (महाबँक) निव्वळ नफ्यात मार्चअखेर तिमाहीत गेल्या वर्षांतील याच तिमाहीतील नफ्याच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. आर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीअखेर बँकेने ३५५ कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. अनुत्पादित कर्जाचे कमी झालेले प्रमाण आणि त्यामुळेच अशा कर्जासाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदीचे प्रमाण घटल्याने बँकेच्या नफ्यात वाढ झाली आहे. बँकेला गेल्या वर्षी याच तिमाहीत १६५.२३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता, अशी माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी ए. एस. राजीव यांनी गुरुवारी आयोजित वेब-पत्रकार परिषदेत दिली.

सरलेल्या तिमाहीत महाबँकेच्या एकूण उत्पन्नात घट झाली आहे. बँकेचे एकूण उत्पन्न तिमाहीत ३,९४८.४८ कोटी रुपयांवर नोंदले गेले आहे, जे मागील वर्षी याच तिमाहीत ४,३३४.९८ कोटी होते. बँकेच्या निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाणही २.४८ टक्क्यांवरून कमी होत ते सरलेल्या तिमाहीत ०.९७ टक्क्यांवर घसरले आहे. बँकेच्या व्यवसायात १९.८४ टक्क्यांची वाढ होऊन तो मार्च तिमाहीत ३,३७,५३४ कोटींवर पोहोचला आहे. तसेच बँकेतील ठेवींचे प्रमाण १६.२६ टक्क्यांनी वाढून २,०२,२९४ कोटींवर पोहोचले आहे

सरलेल्या २०२१-२२ या संपूर्ण आर्थिक वर्षांत बँकेने १,१५१.६४ कोटींचा एकूण निव्वळ नफा प्राप्त केला. जो त्याआधीच्या आर्थिक वर्षांत ५५१.४१ कोटी रुपये होता. तसेच बँकेने सरलेल्या आर्थिक वर्षांत १५,६७२.१७ कोटींचे उत्पन्न मिळविले आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षांत १४,४९७.५६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले होते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahabank quarterly profit doubles bank of maharashtra debt reduction ysh

ताज्या बातम्या