मुंबई : रत्ने व आभूषणनिर्मिती प्रकल्पांसाठी देशातील सर्वात मोठे एकात्मिक ज्वेलरी पार्क हे महाराष्ट्रात नवी मुंबई येथे विकसित होत आहे. त्याच धर्तीवर दागिने घडविणाऱ्या आधुनिक यंत्र, पूरक सामग्रीचा समूह उद्योग स्थापण्यासाठी महाराष्ट्रच हेच आदर्श ठिकाण ठरेल आणि आवश्यक त्या सर्व पायाभूत सोयीसुविधांसह सर्व मदत राज्य सरकारकडून केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी दिली. देशातील पहिल्यावहिल्या ‘ज्वेलरी मशिनरी’ला वाहिलेल्या ‘जेएमएआयआयई’ आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
एमआयडीसीकडून ‘जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलशी (जीजेईपीसी)’ करार करून नवी मुंबईत हजाराहून अधिक रत्न व आभूषण क्षेत्रातील विविध प्रकल्प साकारण्याची या ज्वेलरी पार्कची उभारणी सुरू आहे. महाराष्ट्रात २० हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आकर्षित केली जाऊन, दीड लाखाहून अधिक रोजगाराच्या संधी यातून निर्माण होतील, असे देसाई यांनी स्पष्ट केले. याच धर्तीचा समूह उद्योग – यंत्र, उपकरणे व सामग्री उत्पादनासाठी तयार केला गेल्यास तो पूरकच ठरेल आणि ज्वेलरी मशिनरी असोसिएशनने यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करून, सरकारच्या वतीने साहाय्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात शुक्रवार, ८ एप्रिलपर्यंत खुल्या असलेल्या प्रदर्शनात ५०० दालने असून, अमेरिका, जर्मनी, इटली, हाँगकाँग, थायलंड व तुर्कस्तानातून २६ प्रदर्शक सहभागी झाले आहेत, असे या प्रदर्शनाच्या आयोजक केएनसी सव्‍‌र्हिसेसच्या क्रांती नागवेकर यांनी सांगितले. मुंबई, राजकोट, कोइम्बतूर, कोलकाता येथूनही उत्पादक ५० हजार ते ५० लाखांपर्यंतच्या सामग्री आणि यंत्रांसह या प्रदर्शनात सहभागी झाले असल्याचे त्यांनी सांगितले.