मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाने बनावट बीजकांच्या माध्यमातून होणाऱ्या कर चोरीसंदर्भात सुरू असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत नंदकिशोर बालूराम शर्मा (वय ४२) यांस अटक केली आहे. मे. साई गुरु एन्टरप्राईज व इतर आठ कंपन्यांबाबत वस्तू व सेवाकर विभागाकडून तपास सुरू आहे.

सहाय्यक राज्य कर आयुक्त गणेश विलास रासकर, अविनाश चव्हाण, संजय शेटे यांनी केलेल्या चौकशीत सर्व बनावट कंपन्या नंदकिशोर बालूराम शर्मा नावाची व्यक्ती चालवत असल्याचे आढळून आले. नंदकिशोर शर्मा हा अशा प्रकारच्या २६ बनावट कंपन्या चालवत असून या कंपन्यांमार्फत आतापर्यंत २,२१५ कोटी रुपयांची बनावट बीजके बनविण्यात आलेली आहेत. यामध्ये हिरे, कपडे, स्टील इत्यादी वस्तूंच्या बीजकांचा समावेश आहे. याप्रकरणी वस्तू व सेवाकर विभागाला १२६ कोटी रुपयांची करचोरी उघड करण्यात यश आले आहे. या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर धागेदोरे आहेत का, याबाबतचा तपास सुरू आहे. महानगर दंडाधिकाऱ्यांनी शर्मा यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.