तळेगावमध्ये विद्युत वाहननिर्मिती प्रकल्प

मुंबई : राज्य सरकारने अलिकडेच जाहीर केलेल्या विद्युत वाहन धोरणाला अनुसरून, कॉसिस ई मोबिलिटी या कंपनीने २,८२३ कोटी  रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार शुक्रवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाबरोबर केला. तळेगाव येथे कंपनीचा विद्युत वाहन निर्मितीचाप्रकल्प उभारण्यात येणार असून त्यायोगे १२५० जणांना थेट रोजगार मिळणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि कॉसिस ई मोबिलिटी कंपनी दरम्यान पुण्याजवळील प्रस्तावित प्रकल्पासाठी सह्यद्री अतिथीगृह येथे शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला. एमआयडीसीतर्फे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी अन्बलगन यांनी तर कॉसिसच्या वतीने संचालक रवीकुमार पंगा यांनी करारावर स्वाक्षरी केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, कॉसिस समूहाचे प्रमुख राम तुमुलुरी, एमआयडीसीचे महाव्यवस्थापक अभिजीत घोरपडे आदी या वेळी उपस्थित होते.

कॉसिसतर्फे  पहिल्या टप्प्यात विद्युत बॅटरीचा पुरवठा करण्यासाठी इग्लंड येथे मोठा प्रकल्प उभारण्यात येणार असून तळेगावमधील प्रकल्पात सार्वजनिक वाहतुकीच्या डिझेलवर धावणाऱ्या बसचे रूपांतर विद्युत वाहनांमध्ये करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विद्युत बॅटरीचा  उत्पादन प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील प्रमुख शहरातील सार्वजनिक वाहतुकीत विद्युत शक्तीवर चालणाऱ्या वाहनांचा वाटा २५ टक्के  होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

महाराष्ट्र पर्यावरणपूरक शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्याने इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून त्याअंतर्गत ई-मोबिलिटी उत्पादन आणि पायाभूत सुविधा विकास क्षेत्रात कॉसिस कंपनी मार्फत गुंतवणूक केली जात आहे. या कंपनीला राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या ईव्ही धोरणाबाबत माहिती दिली. प्रदूषण कमी करणे ही आजची गरज असून बदलत्या तंत्रज्ञानानुसार महाराष्ट्र ई मोबिलिटीकडे वाटचाल करीत आहे. वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने अत्यावश्यक बाबींचा स्वीकार करण्याच्या राज्याच्या धोरणानुसार राज्यात गुंतवणूक करीत असल्याबद्दल त्यांनी कॉसिस कंपनीचे स्वागत केले.