scorecardresearch

महाराष्ट्राच्या कापड उद्योगाला चिनी संजीवनी

महाराष्ट्रातील मरगळलेला कापड उद्योग, कृषी उत्पादनांवर प्रक्रियेच्या तंत्रज्ञानाची कमतरता या सर्वावर मात करण्यासाठी चीनमधील उद्योगांकडून गुंतवणूक होणार

महाराष्ट्रातील मरगळलेला कापड उद्योग, कृषी उत्पादनांवर प्रक्रियेच्या तंत्रज्ञानाची कमतरता या सर्वावर मात करण्यासाठी चीनमधील उद्योगांकडून गुंतवणूक होणार असेल तर ती आम्हाला हवीच आहे, या शब्दांत सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चिनी गुतंवणुकीचे स्वागत केले.
नुकतेच मुंबईत झालेल्या एका छोटेखानी औपचारिक परिसंवादात त्यांनी ही भूमिका मांडली. चीन सरकारची गुंतवणूक असणाऱ्या ‘चायना जेनरटेक’ या फॉच्र्युन ५०० श्रेणीतील कंपनीचे अध्यक्ष ही टाँिक्सग हे मुंबई दौऱ्यावर आले असता या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील, कंपनीचे पदाधिकारी, निवडक उद्योजक, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, गोव्याचे अध्यक्ष आमदार डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. या परिसंवादापूर्वी चायना जेनरटेकच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यातील गुंतवणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली.
चायना जेनरटेक चेअरमन ही टाँिक्सग यांनी आपल्या प्रास्ताविकात कंपनीची महाराष्ट्रात गुंतवणुकीत उत्सुकता असल्याचे नमूद केले. त्याला प्रतिसाद म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील सुमारे २०० सूतगिरण्यांना सध्या भांडवल व नव्या तंत्रज्ञानाची गरज असल्याचे सांगितले. यासाठी चायना जेनरटेकने गुंतवणूक केली तर ते त्यांच्या भांडवलवृद्धीच्या दृष्टीने लाभदायक ठरू शकेल आणि लाभांशाच्या रूपात चायना जेनरटेकलादेखील परतावा मिळवू शकेल, असे मत मांडले.
तसेच कृषी उत्पादनाचे अनेक प्रक्रिया प्रकल्प बंद आहेत, त्यातदेखील गुंतवणुकीला वाव असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. प्रमोद सावंत यांनीदेखील औषधनिर्मिती आणि बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करण्यास चायना जेनरटेकचे स्वागतच होईल, असे सांगितले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2015 at 07:35 IST

संबंधित बातम्या