नवी दिल्ली : देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी असलेल्या महिंद्र अँड मिहद्रने सर्व श्रेणीतील वाहनांच्या किमती तात्काळ प्रभावाने २.५ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला.

वाहन निर्मितीसाठी येणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. पोलाद, अ‍ॅल्युमिनियम आणि पॅलेडियमसारख्या मौल्यवान धातूंच्या किमती गेल्या एका वर्षांत वाढल्यामुळे वाहनांच्या किमतीत वाढ करणे क्रमप्राप्त आहे, असे कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

वाहनांच्या सुटय़ा भागांच्या किमतीत सतत वाढ होत आहे. यामुळे अंशत: भरपाई करण्यासाठी कंपनीने आवश्यक पावले उचलली आहेत, ज्यामुळे किंमत वाढीचा काही आंशिक बोजा ग्राहकांकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.