जपानची शेतीपयोगी उपकरणांच्या क्षेत्रातील अग्रणी मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजच्या ट्रॅक्टर विभागात ३३ टक्के भागभांडवलावर महिंद्र अँड महिंद्र लिमिटेडने मालकी मिळविली आहे.
२.५ कोटी अमेरिकी डॉलरच्या (सुमारे १५८ कोटी रुपये) मोबदल्यात झालेल्या व्यवहारातून महिंद्रला मित्सुबिशीच्या मदतीने ट्रॅक्टर व कृषीपयोगी तंत्र-अवजारे बनवून ती जागतिक बाजारपेठेत उतरविण्याची व्यवसायसंधी खुली झाली आहे. महिंद्रचे गेल्या दशकभरापासून मित्सुबिशीसह अमेरिकेत विपणन व विक्री भागीदारीचे सख्य सुरू आहे.
टोक्योत मुख्यालय असलेल्या मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजशी झालेला हा व्यवहार येत्या ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.
महिंद्रकडून होणाऱ्या गुंतवणुकीने जपानी कंपनीला भांडवली पाया विस्तारण्यास मदत होईल, असे या व्यवहाराची पत्रकारांना माहिती देताना, महिंद्र अँड महिंद्रचे कार्यकारी संचालक पवन गोएंका यांनी सांगितले. अमेरिकेतील विपणन भागीदारीबरोबरच, मित्सुबिशीकडून महिंद्रच्या ट्रॅक्टर्ससाठी लागणाऱ्या विविध सुटय़ा घटकांचा पुरवठा केला जात आहे.