मोदी सरकार हे पाच वर्षांसाठी सत्तेवर आले आहे. त्यामुळे एका वर्षात लगेच बदल घडून येईल असे होणार नाही, त्याला वेळ लागेल. बदल कधीही लगेच घडून येत नाहीत. त्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि आपण तो सरकारला द्यायला हवा. मी प्रत्येक सरकारकडे नेहमी आशेनेच पाहिले आहे. देश भ्रष्टाचारमुक्त होईल, देशात बदल घडून येईल, निदान हे सरकार तरी काहीतरी करेल अशा माझ्या आणि सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा असतात. या सरकारने नागरिकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा नाहीतर लोकांचा भ्रमनिरास होईल. ज्यांना शक्य आहे त्यांना मोदींनी गॅसची सबसिडी न घेण्याचे आवाहन केले आहे. मला वाटते माणसाने जितकी गरज आहे तितकाच गोष्टींचा वापर करावा. मी माझ्या गरजा जास्त वाढू दिलेल्या नाहीत. माझ्या गरजा मर्यादित आहेत. त्यामुळे मला गॅस सबसिडीची गरज वाटलीच नाही म्हणून मी सबसिडी घेतलीच नाही.
लोकसहभागातून बजेटचे नियोजन केले गेले पाहिजे. यावर्षी पाऊस खूप कमी पडला आहे. त्यामुळे सहाजिकच मे महिन्यानंतर पाण्याचा तुटवडा निर्माण होईल. मराठवाड्यामध्ये तर पाण्याचे खूप हाल आहेत. त्यामुळे सरकारने दुष्काळग्रस्त भागात पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून त्याचा अपव्यय होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. सरकार बजेटमध्ये गावांसाठी काही योजना, आर्थिक रक्कम मदत जाहीर करते. पण याबद्दलची माहितीच अनेकांना नसल्याने त्या पैशांचा गैरवापर केला जातो. गावातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या गावासाठी जाहिर केलेल्या योजनांची माहिती असायला हवी. त्यामुळे गावासाठी जाहीर केलेल्या निधीचे नियोजन ठराविक मंडळी न करता लोकसहभागातून त्याचे नियोजन केले जाईल. यातून पैशांचा गैरवापर होणार नाही आणि गावाची प्रगतीही होईल.