जिरे, तीळ, एरंडेल, बडीशेप तसेच बाजरीसाठी उत्तम प्रतवारीचे संकरित बियाणे म्हणून मध्य-भारतात पसंती मिळविणाऱ्या मंगलम सीड्स लि. या कंपनीने आगामी काळात आणखी संशोधन व विकास उपक्रमाला गती देण्याची योजना बनविली आहे. त्यासाठी आवश्यक भांडवल भागविक्री करून उभारण्याचे तिने प्रस्तावित केले असून, मुंबई शेअर बाजाराच्या सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योगांसाठी (एसएमई) स्थापित मंचावर सूचिबद्धतेचा तिचा मानस आहे. पँटोमॅथ अ‍ॅडव्हायजरी सव्‍‌र्हिसेस लि. ही कंपनी या प्रस्तावित भागविक्रीचे व्यवस्थापन पाहत आहे. मफतलाल पटेल यांच्या नेतृत्वाखाली कंपनी निर्माण केलेल्या संधींचा लाभ उचलू शकतील, असा विश्वास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक महावीर लुनावत यांनी व्यक्त केला. प्रारंभिक खुली भागविक्री जुलैमध्ये येणार असून, प्रवर्तक भागविक्रीतून २६.५० भांडवली हिस्सा कमी करतील. यातून १० रु. दर्शनी मूल्याचे ११.४० लाख समभाग प्रत्येकी ५० रु. किमतीला विक्रीला येतील. कंपनीला या भागविक्रीतून ५.७० कोटींचे भांडवल उभे राहणे अपेक्षित आहे.