नवी दिल्ली : कंपन्यांनी अधिक कामगाराची केलेली नियुक्ती आणि सुटे घटक व कच्चा माल यांच्या किमतीही काही नरमल्याने निर्मिती क्षेत्रासाठी सरलेला सप्टेंबर महिना मासिक तुलनेत क्रियाकलाप किंचित घटले असले तरी एकंदर सुस्थितीचा राहिला, असे सोमवारी प्रसिद्ध झालेल्या मासिक सर्वेक्षणातून दिसून आले.

हंगामी समायोजित एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल इंडियाच्या सर्वेक्षणाने भारतीय निर्मिती क्षेत्राच्या आरोग्यामध्ये येत्या काळात मजबूत सुधारणांचा सुस्पष्ट कल दर्शविला आहे. कंपन्यांनी नवीन कामाच्या प्रमाणात सतत वाढ नोंदविताना, उत्पादनही वाढवत आणले आहे, असे हे सर्वेक्षण सांगते. निर्मिती उद्योगातील खरेदी व्यवस्थापकांमध्ये पार पडलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे ‘मॅन्युफॅक्चिरग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्सने (पीएमआय)’ निर्धारित केला जातो, तो सप्टेंबरमध्ये ५५.१ वर नोंदविला गेला. ऑगस्टमध्ये नोंदल्या गेलेल्या ५६.२ अंशांपेक्षा तो थोडा कमी आला असला तरी सलग १५व्या महिन्यात ५० गुणांपेक्षा अधिक म्हणजे त्याचा विस्तारदर्शक कल राहिला आहे.

एस अ‍ॅण्ड पी ग्लोबलच्या अर्थतज्ज्ञ पॉलियाना डी लिमा यांनी स्पष्ट केले की, जागतिक स्तरावर परिस्थिती प्रचंड आव्हानात्मक असताना आणि मंदीचे सावट सर्वत्र असूनही भारतीय निर्मिती उद्योग उत्तम स्थितीत आहे, असे सर्वेक्षणातील ताजी आकडेवारी दर्शविते. सप्टेंबरमध्ये नवीन कार्यादेश आणि उत्पादनामध्ये महिनागणिक किंचित नरमाई दिसत असली, वाढीचा प्रवाह मात्र कायम आहे. काही प्रमुख संकेतकांनी असे सूचित केले आहे की, कमीत कमी कालावधीत उत्पादन आणखी वाढेल यासाठी नवीन कामगार भर्ती केली गेली. कंपन्या विक्री करार पूर्ण करण्याचा आणि मालसाठा पुन्हा भरण्याचा प्रयत्नही दिसून आल्याचे डी लिमा यांनी निरीक्षण नोंदवले.