२५८ अंशांच्या मुसंडीसह सेन्सेक्स दोन महिन्यांच्या उच्चांकावर

आगामी आठवडय़ात बुधवारी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत सकारात्मक निर्णयांच्या अपेक्षांनी गुंतवणूकदारांनी मंगळवारी बाजारात दमदार खरेदी केली. परिणामी सेन्सेक्सने २५८ अंशांची मोठी वाढ साधत २७,३७६ अशी दोन महिन्यांपूर्वीच्या उच्चांकाला गवसणी घातली, तर निफ्टीने तब्बल १ टक्क्यांची म्हणजे ८३ अंशांची झेप घेत  ८४५० पल्याड ८,४७५.८० ची पातळी गाठली.

काही बडय़ा कंपन्यांनी प्रस्तुत केलेली समाधानकारक तिमाही कामगिरीही गुंतवणूकदारांसाठी सुखावणारी ठरली. एचडीएफसी बँक, टाटा कम्युनिकेशन्स, एचसीएल टेक यांच्या तिमाही निकालांनी गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण केला. मध्यान्हीला खुल्या झालेल्या युरोपातील बाजारांची सकारात्मक सुरुवातही उत्साह दुणावणारी ठरली.

भांडवली बाजारातील वधारलेल्या खरेदीमागे डॉलरच्या तुलनेत मजबूत बनलेल्या रुपयाही कारणीभूत ठरला. चलन बाजारातील व्यवहारात रुपयाने डॉलरच्या तुलनेत पडझडीला विराम देत मंगळवारी सरशी मिळविल्याचे दिसून आले.

एकंदर बाजारात खरेदीचे स्वरूप सर्वव्यापी होते. बीएसई मिड कॅप आणि स्मॉल कॅप या मधल्या फळीतील समभागांनाही मोठी मागणी मिळाल्याचे दिसून आले. परिणामी या निर्देशांकांनी अनुक्रमे ०.९६ आणि ०.८५ टक्के अशी प्रमुख निर्देशांकाच्या तुल्यबळ कमाई केली.