सोमवारी तेजीने सुरुवात, मंगळवारी घसरण, बुधवारी पुन्हा बाजार वर तर गुरुवारी घसरगुंडी आणि सप्ताहअखेर पुन्हा तेजीने.. या धबडग्यात सेन्सेक्स हा प्रमुख निर्देशांक एक दिवस २० हजारावर तर दुसऱ्याच दिवशी २० हजारांखाली. कारण काय तर प्रॉफिट बुकिंग! बाजार महत्त्वाच्या टप्प्यावर असताना दिसणारी उत्सुकता आणि बरोबरीने चिंतेची धारणाच सध्या अनुभवास येत आहे. बाजाराने वर जाण्याची कारणे स्पष्टच आहेत. सरकारची आर्थिक आघाडीवरील सुधारणासदृश्य दृढ बांधिलकी, विदेशी वित्तसंस्थांचा भारतीय बाजारांवरील कमालीचा भरवसा आणि एकंदर अनुकूल जागतिक स्थितीतूनच सेन्सेक्सने २० हजाराची पातळी गाठली. कंपन्यांचा तिमाही निकालांच्या हंगामात आजवर तरी दिसून आलेल्या चांगल्या कामगिरीने ही पातळी टिकवूनही ठेवली आहे.
प्रश्न असा की, २० हजारापल्याड आणखी वर जाण्याला वाव आहे काय? रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांच्याकडे या प्रश्नाचे उत्तर निश्चितच दडले आहे. अर्थमंत्री चिदम्बरम यांच्याबाबतीत म्हणाल तर त्यांची गुंतवणूकदार-प्रियता टिकून आहे आणि सिंगापूर-हाँगकाँगमधील त्यांच्या रोड शोज्नंतर ती उत्तरोत्तर वधारतच आहे. फेब्रुवारीअखेर त्यांच्याकडून सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातूनही त्यांची ही गुंतवणूकदार-माया दिसून यावी, हीच एकमेव अपेक्षा!
बाजारअग्रणी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये रु. ९०० पल्याड तेजी ही एक सुखकारक बाब म्हणावी लागेल. तेल व वायू क्षेत्राबाबत सरकारने दाखविलेल्या धडाडीनेच हे घडविले आहे. परंतु या परिणामी धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्या समूहातील कंपन्यांचे भावही वधारत आहेत. विशेषत: भारती एअरटेल, आयडियाने कॉलदरात वाढीची घोषणा करून, संपूर्ण दूरसंचार क्षेत्राला अडचणीतून डोके वर काढण्याची संधी मिळवून दिली आहे. म्हणूनच नफ्यात जवळपास ४० टक्क्यांनी घसरण दाखविणाऱ्या तिमाही निकालानंतर अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचा भाव पडण्याऐवजी वधारत आला आहे. धातू क्षेत्रात टाटा स्टीलच्या भावात निरंतर अफरातफरीची स्थिती आहे, तर सेल, हिंडाल्को सतत घटत चालले आहेत. बाजारात स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपन्यांना जरूरच वाईट दिवस आहेत, परंतु त्यातही ‘एचडीआयएल’चा समभाग केवळ तीन-चार दिवसात तब्बल २८ टक्क्यांनी आपटी खातो हे भयंकरच म्हणायचे.
सरलेल्या २०१२ सालात बाजाराने छोटय़ा गुंतवणूकदारांच्या पदरी काही पाडण्याऐवजी खिशाला कात्री लावण्याचे काम केले, अशातच निर्देशांकाने २० हजाराची पातळीही ओलांडली. या पुढचा प्रवास अनिश्चिततेने भारलेला असल्याने छोटय़ा गुंतवणूकदारांना काठावर बसूनच प्रतीक्षा करावी लागणार काय? आगामी महिना हा अर्थसंकल्पाचा असून, बाजाराचा कलाचा अंदाज बांधणे अशा स्थितीत कठीण असते. एकूण एप्रिल- मे महिन्यांनंतर ऐतिहासिकदृष्टय़ा बाजार नरमच असतो. त्यामुळे मध्यम व दीर्घकालीन खरेदीसाठी हा काळ बरा नव्हे, इतकेच सांगता येईल. मागे सुचविलेला परसिस्टंट सिस्टम सध्या खूपच चालला आहे, याचा वाचकांना अनुभव आला असेलच.